वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बारामुल्ला येथून बुधवारी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, मॅगझीन, 4 जिवंत काडतुसे आणि एक ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला स्फोट घडवून देशात हाहाकार माजवण्याचा प्रयत्न दहशतवादी संघटनांकडून कट रचला जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली आहेत. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. बारामुल्ला शहरात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत विशिष्ट माहितीवरून ही अटक करण्यात आली. आरोपींविऊद्ध युएपीए आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.