सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम : 35 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट
बेळगाव : पर्यावरणाचा समतोल राखून वृक्षसंख्येत वाढ व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत दरवर्षी लाखो रोपांची लागवड केली जाते. यंदाच्या हंगामात विभागाने तब्बल 35 हजारहून अधिक रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. विशेषत: ग्रामीण भागामध्ये ही रोप लागवड केली जाणार आहे. पावसाला सुरुवात होताच रोप लागवडीचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाने दिली. ग्रामीण भागातील संपर्क रस्ते, खुल्या जागा, सरकारी जागा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा आणि इतर ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. आंबा, काजू, फणस, चिकू, कडीपत्ता, जांभूळ, लिंबू आदी रोपांचा यामध्ये समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा रोप लागवड केली जाणार असल्याने वाहनधारकांना विविध फळांची चव चाखता येणार आहे. त्याबरोबरच स्मशानभूमी आणि इतर ठिकाणीही वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते आणि विविध परिसर हिरवाईने नटणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा आणि वृक्षसंपदा वाढावी, या दृष्टिकोनातून ही लागवड केली जाणार आहे. याचबरोबर प्रत्येक ग्राम पंचायतीला काही रोपांचे वितरण केले जाणार आहे. विशेषत: यासाठी रोजगार हमी योजनेची मदत घेतली जाणार आहे. रोजगार हमी योजनेतील कामगारांकडून ख•dयांची खोदाई होणार आहे. त्यामुळे कामगारांना काम उपलब्ध होणार आहे. गतवर्षी 30 हजार रोपांची लागवड झाली होती. मात्र, यंदा 35 हजार रोप लागवड केली जाणार आहे. दमदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर ही रोप लागवड हाती घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील बेळवट्टी, हिंडलगा, हंदिगनूर, बेळगुंदी, मंडोळी, बंबरगे, होनगा, काकती, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ आदी ठिकाणी रोप लागवड केली जाणार आहे. गतवर्षी लागवड करण्यात आलेली रोपे जोमाने आली आहेत. या रोपांना कुंपण घालण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. विशेषत: रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड होणार असल्याने रस्ते हिरवाईने फुलणार आहेत. त्याबरोबरच विविध फळ झाडांची लागवड होणार असल्याने स्थानिक नागरिकांना विविध फळे उपलब्ध होणार आहेत.
सामाजिक वनीकरण विभागामार्फत बेळगाव तालुक्यातील विविध भागात रोप लागवड केली जाणार आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर ही लागवड होणार आहे. गतवर्षीपेक्षा रोपांची लागवड अधिक प्रमाणात होणार आहे. मात्र, यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्यदेखील गरजेचे आहे.
प्रशांत जैन, सामाजिक वनीकरण अधिकारी