वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
आशियाई क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळमध्ये भारताच्या तिसऱ्या मानांकित विदित गुजराथीने वैयक्तिक विभागातील तिसऱ्या व चौथ्या फेरीत शानदार विजय नोंदवले.
28 वर्षीय गुजराथीने तिसऱ्या फेरीत थायलंडच्या प्रिन लाओआविरापपचा तर चौथ्या फेरीत व्हिएतनामच्या ले तुआन मिन्हचा पराभव केला. त्याचे एकूण 3 गुण झाले असून तो सहाव्या स्थानावर आहे. अर्जुन इरिगेसीचेही 3 गुण झाले असून आघाडीवरील खेळाडूपेक्षात ते अर्ध्या गुणाने मागे आहेत. 22 वर्षीय इरिगेसीने व्हिएतनामच्या एन्ग्युएन एन्गॉक ट्रुआँग सनचा तिसऱ्या फेरीत पराभव केला तर चौथ्या फेरीत इराणच्या तबाताबेइविरुद्धचा डाव अनिर्णीत राखला.
महिला विभागात चीनच्या अग्रमानांकित हाऊ यिफानने भारताच्या डी. हरिकाचा तिसऱ्या फेरीत तर कोनेरू हंपीचा चौथ्या फेरीत पराभव केला. हंपीने तिसऱ्या फेरीत चीनच्याच झु जिनरला बरोबरीत रोखले होते. हरिकाने चौथ्या फेरीत उझ्बेकच्या निलुफर याकुबबाएव्हाला बरोबरीत रोखले. हरिका व हंपी यांचे अन्य पाच खेळाडूंसह प्रत्येकी 2.5 गुण झाले आहे. यिफानने मात्र एका गुणाची आघाडी घेत चार फेऱ्यानंतर पहिले स्थान मिळविले आहे.