जानेवारी होणार श्रीलंकेत स्पर्धा : आयसीसीकडून घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
आयसीसीने अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेच्या 15 व्या आयोजनात 16 संघ सहभागी होतील. तसेच स्पर्धेच्या स्वरूपामध्ये काही उल्लेखनीय बदल करण्यात आले असल्याचे आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले.
श्रीलंका तिसऱ्यांदा या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार असून, 2006 नंतर ते पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन करतील. 13 जानेवारी रोजी यजमान श्रीलंका व झिम्बाब्वे सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन होईल. विद्यमान विजेता भारत दुसऱ्या दिवशी बांगलादेशविरुद्ध सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दरम्यान सहभागी 16 संघांना चार गटांमध्ये विभागले जाईल, प्रत्येक गटात चार संघ असतील, परंतु प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरी जातील. 13 ते 21 जानेवारी दरम्यान साखळी फेरीचे सामने होतील. भारतीय संघाचा समावेश अ गटात असून भारताशिवाय बांगलादेश, अमेरिका व आयर्लंड हे देखील याच गटात आहेत. श्रीलंकेतील पाच मैदानांवर हा विश्वचषक खेळला जाईल. स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी पाहिल्यास भारतीय संघाने 2000 मध्ये मोहम्मद कैफ यांच्या नेतृत्वात श्रीलंकेतच प्रथम विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यानंतर 2008 मध्ये विराट कोहली यांच्या नेतृत्वात, 2012 मध्ये उन्मुक्त चंद, 2018 मध्ये पृथ्वी शॉ व 2022 मध्ये यश धूलच्या नेतृत्वात वर्ल्डकपच जिंकला आहे.