वृत्तसंस्था/ बेंगळूर
व्हिवो पुरस्कृत नवव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील शनिवारी येथील श्री कंठीरेव्वा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भरतच्या शानदार कामगिरीच्या जोरावर यजमान बेंगळूर बुल्सने यु मुम्बाचा 42-32 अशा दहा गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत यु मुम्बाने बेंगळूर संघावर 24-11 अशी भक्कम आघाडी घेतली होती.
बेंगळूर बुल्स संघातील भरतने शानदार कामगिरीचे प्रदर्शन घडविताना 16 गुण तर विकास कांडोलाने 8 गुण नोंदविले. बेंगळूर संघातील गुमान सिंगने आपल्या चढाईवर यु मुम्बाचे काही खेळाडू बाद करून पाचव्या मिनिटाला 6-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर यु मुम्बाच्या खेळाडूंनी बेंगळूर बुल्सचे सर्व गडी बाद करून 10-3 अशी बडत घेतली होती. मध्यंतरापर्यंत यु मुम्बाने बेंगळूरवर 13 धावांची भक्कम बडत मिळविली होती. पण सामन्याच्या उत्तरार्धातील पहिल्याच मिनिटाला भरतच्या चढाईवर यु मुम्बाचे सर्व गडी बाद झाले. 31 व्या मिनिटाला बेंगळूर बुल्सने यु मुम्बावर 28-27 अशी नाममात्र आघाडी घेतली होती. 36 व्या मिनिटाला बेंगळूरने यु मुम्बावरील आघाडी वाढविली. अखेर बेंगळूर बुल्सने हा सामना 10 गुणांच्या फरकाने जिंकला.