महाराष्ट्रातील हिवरेचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांची उचगाव ग्राम. पं. सदस्यांनी घेतली भेट
वार्ताहर /उचगाव
उचगाव ग्रा. पं. सदस्यांनी अहमदनगर येथील आदर्श गाव हिवरे बाजार येथे जाऊन महाराष्ट्राचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांची भेट घेतली. पवार यांनी केलेल्या हिवरे बाजार विकासाबद्दल माहिती जाणून घेऊन याच धर्तीवर उचगाव ग्रा. पं. कार्यक्षेत्रामध्ये विकास करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी पोपटराव पवार यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, 25 वर्षांमध्ये हिवरे बाजाराचा कायापालट कसा केला व एक आदर्श ग्राम संसद म्हणून मान मिळविला याबद्दल सविस्तर सांगितले.
ते पुढे म्हणाले, सुरुवातीला मी एक क्रिकेटपटू होतो. पण खेळता खेळता सामाजिक बांधिलकी म्हणून नकळत गावच्या ग्रा. पं. निवडणुकीत भाग घेतला व त्याठिकाणी मी निवडून आलो. गावासाठी काही तरी केले पाहिजे हा मनी ध्यास होता. त्यातून मी काम करण्याचे ठरवले व सर्व सदस्यांनी मी पदवीधर असल्याने मला अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर गावच्या विकासासाठी एकेक पाऊल उचलत गेले.
सुरुवातीच्या काळामध्ये काम करत असताना मला काही ठिकाणी विरोधी झाला. पण त्यानंतर लोकांचा माझ्यावरील विश्वास वाढला व लोकांना एकत्र घेऊन गावच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी चर्चा करू लागलो. हे करत असताना सरकार दरबारी जाऊनही आम्ही गावासाठी फंड उभा केला व त्या फंडातून गावच्या विकासाला चांगल्या प्रकारे हातभार लावला. त्यामुळेच मला महाराष्ट्र सरकारकडून आदर्श सरपंच हा बहुमान मिळाला.