मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे. त्यात मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी जवळपास लागल्यात जमा आहे. त्यानंतर साताऱ्याचे राजे उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) यांनी मुंबईकडे धाव घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा सत्कार केला. सत्तापालटाचा खेळ संपल्यानंतर उदयनराजे यांनी मुंबईत जाऊन फडणवीस यांचे कौतुक केलेच शिवाय साताऱ्यांच्या दोन्ही राजांचे मनोमिलन मुंबईच्या सागर बंगल्यावर झाल्याचे पाहायला मिळाले.
सत्तापालट नाट्यात साताऱ्याचे दोन्ही राजे देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीतून निवडून आले असतानाही खासदारकीचा राजीनामा दिलेल्या उदयनराजेंनी फडनवीसांना ‘थेट’ शुभेच्छा दिल्या आहेत. या पाठोपाठ अजित पवारांशी विशेष संबंध असलेल्या आमदार शिवेन्द्रराजे यांनीही फडणवीसांची भेट घेत मंत्रिपदाचा खुट्टा बळकट केला आहे. साताऱ्याचे हे दोन्ही राजे फडणवीसांच्या “सागर” बंगल्यावर एकाचवेळी तळ ठोकून असल्याचे दिसले. साताऱ्याच्या एकाच पक्षात आलेल्या या दोन्ही राजेंचे किमान मुंबईत तरी फडणवीस या विषयावर मनोमिलन झाल्याचे बोलले जात असून या राजेंची साताऱ्यातील भूमिका काय असणार? याची साऱ्यांना उत्सुकता आहे.