उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शेवटी एकमेकांचे भाऊ आहेत. त्यांना एकत्र येण्यासाठी कोणाच्या मध्यस्थिची गरज नसल्याचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीनंतर हे दोन्ही नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शेवटी एकमेकांचे भाऊच आहेत. त्यांना कोणच्याही मध्यस्थीची गरज नाही. ते एकमेकांशी बोलू शकतात. ना उद्धव ठाकरेंना मध्यस्थीची गरज आहे ना राज ठाकरेंना राज ठाकरेंशी माझे जवळचे नातेही कुणाला माहीत नाही. आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी आमच्यात आजही भावनिक बंध आहेत.” असे असे सांगताना त्यांना कोणत्याही राजकीय स्टंटची गरज नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यापुर्वी अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या कार्यालयात गेले. अभिजित पानसेंनी आपली काही वैयक्तिक कामानिमित्त भेट घेतली असल्याचे सांगितले. त्यावर अभिजीत पानसे यांनी, “अलीकडच्या राजकीय घडामोडींवर किंवा अशा बैठकींमध्ये चर्चा होणार हे उघड आहे. पण मी युतीचा कोणताही प्रस्ताव मांडला नाही,” असेही त्यांनी सांगितले.