वृत्तसंस्था/ कीव्ह
रशियाविरोधातील युद्धाकरता जर्मनीने लेपर्ड 2 रणगाडय़ांची पहिली तुकडी युक्रेनसाठी रवाना केली आहे. जर्मनीचे संरक्षणमंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी याची माहिती दिली आहे. हे 18 रणगाडे युद्धात युक्रेनसाठी महत्त्वाची भूमिका बजावतील असे विधान त्यांनी केले आहे.
युक्रेनने लेपर्ड 2 रणगाडे प्राप्त झाल्याची पुष्टी दिली आहे. प्रदीर्घ चर्चा अन् दबावानंतर जर्मनीने जानेवारीमध्ये लेपर्ड 2 रणगाडे युक्रेनला देण्याची तयारी दर्शविली होती. युक्रेनला वेळेत लेपर्ड 2 रणगाडे पुरवून आम्ही आमचा शब्द पाळला आहे. जर्मनीनने लेपर्ड रणगाडय़ांसह 2 टँक रिकव्हरी व्हीकल आणि 40 इन्प्रंट्री फायटिंग व्हीकल्स म्हणजेच रणगाडय़ाला युद्धमैदानापर्यंत पोहोचविणारे वाहन युक्रेनला उपलब्ध केले आहे. लेपर्ड 2 रणगाडा हाताळण्यासाठी जर्मनीने युक्रेनच्या सैनिकांना सुमारे दीड महिन्यांचे प्रशिक्षणही दिले असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.
लेपर्ड रणगाडय़ाची निर्मिती रशियाच्या टी90 रणगाडय़ाशी मुकाबला करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. या रणगाडय़ाची देखभाल करणे अत्यंत सोपे असते. तसेच लेपर्ड रणगाडय़ात अन्य रणगाडय़ांच्या तुलनेत इंधनाचा कमी प्रमाणात वापर होतो.
ब्रिटनकडूनही रणगाडे प्राप्त
जर्मनीच्या लेपर्ड 2 रणगाडय़ांसह युक्रेनला ब्रिटनकडून चॅलेंजर 2 रणगाडे प्राप्त झाले आहेत. युक्रेनचे संरक्षणमंत्री ओलेक्सी रेजनिकोव्ह यांनी चॅलेंजर रणगाडय़ांसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. लेपर्ड-2 रणगाडे रशियाच्या बंकर्सला दूर अंतरावरून नष्ट करू शकतात. लेपर्ड 2 रणगाडय़ांचे सुटे भाग मिळणे आणि दुरुस्ती कार्य तुलनेत सोपे ठरणार आहे.