खालिद सैफीलाही दगडफेक प्रकरणात दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीतील कडकडडूमा न्यायालयाने शनिवारी दिल्ली दंगलप्रकरणी महत्त्वाचा निकाल दिला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी नेते उमर खालिद आणि खालिद सैफी यांची दिल्लीच्या दंगलीप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये राजधानी दिल्लीतील चांदबाग परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणात दोघांनाही जामीन मिळाला होता. मात्र दुसऱया प्रकरणात ते तुरुंगात आहेत.
दिल्ली दंगलीसंदर्भात उमर खालिद आणि खालिद सैफी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एफआयआरमध्ये 24 फेब्रुवारी 2020 रोजी चांदबाग पुलियाजवळ जमलेल्या मोठय़ा जमावाने दगडफेक केल्याचे म्हटले होते. या प्रकरणात खालिद सैफी आणि उमर खालिद यांचीही नावे जोडली गेली. मात्र, या दोघांविरुद्ध कोणताही थेट पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यामुळे न्यायालयाने त्यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. मात्र, या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असली तरी दोन्ही आरोपी सध्या युएपीएशी संबंधित प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.