द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुलकडे नेतृत्व, रोहित, कोहली, बुमराह, शमीला विश्रांती, कसोटीत पुजाराचे पुनरागमन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून जम्मू-काश्मिरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा गोलंदाज अर्शदीप सिंगलाही पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे सोपविण्यात आले असून रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे.
सनरायजर्स हैदराबादइकडून खेळणाऱया उमरान मलिकने 13 सामन्यांत 21 बळी मिळविले. पण सातत्याने 95 मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता लक्ष वेधून घेणारी ठरली. त्याच्यासह पंजाब किंग्सचा डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट अर्शदीप सिंग यालाही राष्ट्रीय संघात प्रथमच निवडण्यात आले आहे. आधी जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली यांच्यासह पेसर्स जसप्रित बुमराह व मोहम्मद शमी यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलकडे कर्णधारपद तर रिषभ पंतकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. ही मालिका 9 जूनपासून सुरू होईल.
याशिवाय इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच देशात होणाऱया एकमेव कसोटीसाठीही संघाची निवड करण्यात आली असून रोहित, कोहली, बुमराह त्यासाठी थेट इंग्लंडला 15 जून रोजी प्रयाण करणार आहेत. मागील दौऱयातील लांबणीवर टाकण्यात आलेली ही कसोटी 1 ते 5 जुलै या कालावधीत एजबॅस्टनवर होणार आहे. या कसोटीसाठी 17 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून चेतेश्वर पुजाराचे त्यात पुनरागमन झाले आहे. तो सध्या इंग्लंडमध्येच ससेक्ससाठी कौंटी क्रिकेट खेळत आहे. त्यातील कामगिरी पाहूनच त्याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. हार्दिक पंडय़ानेही आयपीएलमध्ये चांगले प्रदर्शन केल्याने त्याला टी-20 संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल प्लेऑफमध्ये स्थान मिळविले आहे.
द.आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेसाठी संघ ः केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, पंत (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, हार्दिक पंडय़ा, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी निवडलेला संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, केएस भरत, जडेजा, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, शमी, बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.