रस्त्यावर ठिकठिकाणी ख•s : तातडीने दुऊस्ती करण्याची मागणी
बेळगाव : अनगोळ रघुनाथ पेठ येथील बसवाहतूक रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनगोळ नाका ते धर्मवीर संभाजी चौक पर्यंतच्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण केले. पण रघुनाथ पेठ, मारुती मंदिर चौक, बिर्जे हॉटेल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून रघुनाथ पेठेत जागोजागी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी ड्रेनेजलाईन जोडण्यात आलेल्या ठिकाणी माती मोठ्या प्रमाणात उतरल्याने मोठ्या चरी निर्माण झाल्या आहेत. तर धर्मवीर संभाजी चौकापासून ते रघुनाथ पेठ, मारुती मंदिरपर्यंत काही वर्षांपूर्वी घालण्यात आलेल्या पॅचवर्कमुळे दोन्ही बाजूला रस्ता खचत आहे. जुन्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्या पॅचवर्कमुळे दुचाकी चालक त्यावरूनच वाहने चालवत आहेत. एखाद्या वेळी बस, ट्रक किंवा मोठी वाहने समोरून आल्यास खाली उतरताना वाहने घसरत आहेत.
वाहनांची मोठी वर्दळ
रघुनाथ पेठचा रस्ता हा बस मार्ग आहे तसेच बाबले गल्ली, उद्यमबाग, के. एल. ई. इंजिनियरिंग व खानापूर रोड या भागाला जोडणारा आहे तर टिळकवाडी, बेळगाव आदी भागात जाण्यासाठी याच मार्गाने दररोज नागरिकांची वर्दळ असते. तर वडगाव, येळ्ळूर, संतमीरा शाळा या भागात जाण्यासाठीही रघुनाथ पेठ, बिर्जे सर्कल या रस्त्याचा वापर होत असतो. पण याठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. तर काही स्थानिक युवकांनी त्यामध्ये माती व फुटक्या विटांचा भराव टाकून डबकी मुजविण्याचा प्रयत्न केला आहे. बाबले गल्ली क्रॉस येथेही खड्डे मोठ्या प्रमाणात पडले होते पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी खडी टाकून ते बुजविण्यात आले आहेत. रघुनाथ पेठ बसमार्गावर मात्र डोळेझाक केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्या ठिकाणचे खड्डेही बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक तसेच वाहनचालकांच्यावतीने करण्यात येत आहे.