शिराळा/वार्ताहर
कांदे (ता.शिराळा) येथे दुर्वा राजेंद्र ऊर्फ बंडा कुरणे ( वय ५) मुळगाव शिराळा या बालिकेचा विजेच्या धक्क्याने शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना करणसिंग पांडुरंग चव्हाण कांदे (ता.शिराळा) यांच्या शेतातील शेडमध्ये घडली असून याबाबत दुर्वा हिचे वडील राजेंद्र ऊर्फ बंडा बिष्णू कुरणे (वय ४५) रा. शिराळा यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
तर घटनास्थळावरून व शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, राजेंद्र ऊर्फ बंडा कुरणे हे आई वडील, पत्नी व दोन मुलांसह शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीमध्ये राहण्यास असून त्यांना एक मुलगा व दोन मुली आहेत. सर्वात लहान असणारी दुर्वा ही लहानपणापासून राजेंद्र ऊर्फ बंडा यांच्या सासू प्रमिला खोत यांच्या व सासरे पांडुरंग शंकर खोत मुळगाव- अस्वल वाडी, (ता शिराळा) या आजी आजोबांसोबत राहण्यास होती.
मयत दुर्वा कुरणे हिचे आजी आजोबा प्रमिला खोत व पांडुरंग खोत हे दांपत्य रोजंदारी (घरगडी) म्हणून काम करतात. सदर दाम्पत्य नुकतेच कांदे येथील करणसिंग चव्हाण यांच्याकडे सोमवार दिनांक १४ नोव्हेंबरपासून कामावर रुजू झाले होते. यावेळी आईवडिलांच्या सोबत दुर्वा तसेच आई सोनाली राजेंद्र ऊर्फ बंडा कुरणे याही कांदे येथे चार दिवस राहण्यासाठी गेल्या होत्या. परंतु दुसऱ्याच दिवशी मंगळवार दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास दुर्वा खेळत होती. यावेळी तिने खेळत खेळत शेडला असलेल्या तारेला धरले. यावेळी दुर्वाला अचानक शाॅक लागला व ती बेशुद्ध होऊन खाली पडली. यावेळी तिला तात्काळ शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस हवालदार दिपक खोमने करत आहेत.