भावणुकीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित
सेनापती कापशी / प्रतिनिधी
मराठा सैनिक निधड्या छातीने लढेल, पाकिस्तानचा चौथा विभाग भारतातील चीन भारतावर आक्रमण करेल, देशात समान नागरी कायदा येईल, अशी विविध भाकिते मूळक्षेत्र म्हणून ख्याती असलेल्या कागल तालुक्यातील मेतगे येथील श्री सद्गुरु बाळूमामा व हालसिद्धनाथाच्या भंडारा उत्सवात भगवान डोणे महाराज (वाघापूर) यांनी झालेल्या भाकणुकीत केली. हलसिद्धनाथांची भाकणूक करणारे भगवान डोणे महाराज (वाघापूरकर) यांनी शनिवारी पहाटे मूळक्षेत्र मेतगे येथे भाकणूक केली. या भाकणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या भाकणुकीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
भाकणुकीमध्ये डोणे यांनी सीमा भागात गोंधळ माजल, कर्नाटकातील जलाशयाला भगदाड पडेल, वैरण सोन्याची होईल…!पाण्याची चोरी होईल, दीड महिन्याचे धान्य पिकल, वांग्याच्या झाडाला शिडी लावावी लागेल, शेतकऱ्यांच्या हातात भाकर व खांद्यावर चाबूक राहील, सामान्य माणूसच आनंदात राहील, दुधाचा भाव वाढत राहील, नदीकाठची जमीन ओसाड पडल..!
महागाईत वाढ राहील, दागिने- पैसे मनुष्याला घातक ठरतील, ऊस दरासाठी आंदोलने होतील, भगवा झेंडा राज्य करेल. शर्यतीचा बसवा शाप देईल, जाती धर्मातील तेढ वाढेल. पाकिस्तानचा चौथा विभाग भारतात येईल, भारत मातेचा जयजयकार होईल, मेंढीचा भाव लाखाच्या घरात खेळेल..! साखर कारखान्याचा आणि दूध डेअरीचा मॅनेजर, मालक आनंदात राहील. साखरेचे भाव तेजी-मंदीत राहतील. दूध घालणारा शेतकरी कर्जात जाईल, नदीकाठची जमीन ओसाड पडेल. गुळाचा भाव वाढत राहील, तंबाखूची पेंडी मध्यम पिकेल. मात्र तंबाखूचे भाव गगनाला भीडतील, तंबाखूमुळे रोगराई वाढत राहील.
मातेचे लेकरू मातेला ओळखणार नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही. चालता- बोलता मृत्यू होईल, उषाची भाकरी उशाला राहील, पाण्याचा कप विकत मिळेल..! लाकूड सोन्याचं होईल, लाकडाची डोरली येतील, गाई म्हशीला गहू खायला घातले जातील. कोल्हापूरची अंबाबाई बाळूमामाच्या भेटीला येईल, निपाणी भागात अतिरेकी येऊन जाळपोळ करतील. कर्नाटक राज्याचा चौथा भाग ओसाड पडेल. ऊसाचे, दुधाचे राजकारण ढवळून निघेल, गुंडाचे राज्य येईल. दहा सेंटिमीटर कपडा घालणारा माणूस जन्माला येईल..! ३५ वर्षाचे म्हातारपण येईल, नात्या- नात्यांमध्ये ताटातूट होईल अशी भाकिते भगवान डोणे यांनी केली. त्यांना धनगरी ढोल आणि इतर वाद्यांनी साथ दिली.