युनियन जिमखाना, अमृत पोतदार सीसीआय संघ विजयी
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना संघाने बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी संघाचा 6 गडय़ांनी तर अमृत पोतदार सीसीआय संघाने आनंद क्रिकेट अकादमी संघाचा 109 धावांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अष्टपैलू कामगिरी करणाऱया वैभव कुरूबागी, वैष्णव संघमित्र यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 40.4 षटकात सर्व गडी बाद 131 धावा केल्या. त्यात गणेश मद्दीमनीने 32, प्रिया राजनने 25, सोमशेखर नवलगीमठने 12 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे गौस पीर हाजीने 29 धावात 3, शिवानंद पाटीलने 27 धावात 3, आरिफ मलिकने 10 धावात 2 तर यश हावळाण्णाचे व अधोक्षज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 26 षटकात 4 गडी बाद 137 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. वैष्णव संघमित्राने 9 षटकार 7 चौकारासह नाबाद 57, अमय भातकांडेने 4 चौकारासह 25, विनित पाटीलने 26 तर आर. एन. इंचलने 15 धावा केल्या. बीडीके सी तर्फे अवनिष डी.ने 36 धावात 2 तर पवन जालगारने 1 गडी बाद केला.
बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात सामन्यात अमृत पोतदार सीसीआय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 276 धावा केल्या. वैभव कुरीबागीने 1 षटकार 8 चौकारासह 67, सुशांत कोवाडकरने 4 षटकार 4 चौकारासह 49, झिनत मुडबागीलने 1 षटकार 9 चौकारासह 58, शिवप्रकाश हिरेमठने 22, स्वप्निल एळवेने 21 तर रवीचंद्र उकलीने 19 धावा केल्या. आनंद क्रिकेट अकादमीतर्फे सुधीर गवळीने 48 धावात 3, हर्ष पॅट्रॉटने 45 धावात 2, तर रोहित पाटील, ज्ञानेश होनगेकर, ओंकार देशपांडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीचा डाव 36.5 षटकात 167 धावात आटोपला. विनोद देवाडिगाने 6 चौकारासह 45, यश कळसण्णावरने 4 चौकारासह 34, राहुल नाईकने 21, प्रसाद सुगुरने 13, तर साहिल पारिश्वाडने 11 धावा केल्या. अमृत पोतदार सीसीआयतर्फे वैभव कुरूबागीने 48 धावात 4, झिनत मुडबागिलने 47 धावात 4 गडी बाद केले.