बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चतुर्थ श्रेणी क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून युनियन जिमखाना ब संघाने माळमारुती क्रिकेट क्लब ब संघाचा 8 गड्यांनी तर डायमंड स्पोर्ट्स क्लब अथणी संघाने ग्लॅडिएटर्स क्रिकेट क्लबचा 4 गड्यांनी पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. शुभम भादवणकर, महादेव कारटगी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. केएससीए ऑटोनगर येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात माळमारुती क्रिकेट क्लब ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 गडी बाद 128 धावा केल्या. त्यात जावेद एम. ने 8 चौकारांसह 72, राहुल बजंत्रीने 2 चौकारांसह 29 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे शुभम भादवणकरने 21 धावात 5, ताहिर सराफने 30 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना ब संघाने 17.1 षटकात 2 गडी बाद 131 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात डावखुऱ्या वैभव गोवेकरने 3 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 73, सुशांत पाटीलने 1 चौकारांसह नाबाद 22 तर मिलिंद चव्हाणने 15 तर रोहित पोरवालने 14 धावा केल्या. माळमारुतीतर्फे राहुल बजंत्रीने 31 धावात 2 गडी बाद केले. दुपारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ग्लॅडिएटर्स क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 4 गडी बाद 219 धावा केल्या. त्यात मोहसीनने 1 षटकार 4 चौकारांसह 85, अरिहंत ए. ने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 70, अफिक पठाणने 5 चौकारांसह 30, सद्दाम होसकोटीने 28 तर सिद्देशने 18 धावा केल्या. डायमंडतर्फे पुंडलिक पाटीलने 28 धावात 2 तर महांतेश व अमर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना डायमंड स्पोर्ट्स अथणी संघाने 29.5 षटकात 6 गडी बाद 220 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात महादेवने 2 षटकार आणि 7 चौकारांसह 72, मारुती बी. ने 1 षटकार आणि 5 चौकारांसह 50, मंजुनाथने 28 तर पुंडलिक पाटील व अमर यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ग्लॅडिएटर्सतर्फे दत्तात्रेय व सर्फराज यांनी प्रत्येकी 2, वाहिद व सद्दाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.