बेळगाव : पॉलीट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंट पॉल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55 व्या फादर एडी स्मृती चषक 17 वर्षाखालील निमंत्रितांच्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला 1 सप्टेंबरला प्रारंभ होणार असून. 15 ऑगस्टला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती पॉलीट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी दिली. कॅम्प येथील सेंट पॉल्स हायस्कूल येथे आयोजित पत्रकार परिषद आणि फुटबॉल चषक अनावरण समारंभात ते बोलत होते. डॉ. प्रभू म्हणाले, अनेक दशकांपासून एडी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा ही शहरातील फुटबॉलपटूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा शालेय खेळातील एकतेचे आणि मैत्रीपूर्ण संबंधाचे प्रतीक बनली आहे. एडी स्मृती चषक फुटबॉल स्पर्धेने अनेक तरुण फुटबॉलप्रेमींची स्वप्ने पूर्ण केली आहेत. बिग व्हेंचर्स ब्रॉडबँडचे मालक नागेश छाब्रीया आणि छाब्रिया ग्रुपचे सुमुख छाब्रिया हे यावर्षी स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असल्याचे सांगितले.
पॉलीट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईडचे उद्दिष्ट रक्तदानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आहे. सेंट पॉल्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे 76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 1 पर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी आरोग्य तपासणी शिबिरात तज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. फिनिक्रीडा समितीचे प्रमुख व कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष अमित पाटील म्हणाले, या फुटबॉल स्पर्धेसाठी 20 पैकी 19 संघ निमंत्रित असून राखीव कोट्यातून एका संघाची निवड होणार आहे. यामध्ये फिनिक्स पब्लिक, सेंट झेवियर्स, केएलएस, एम. व्ही. हेरवाडकर, मराठी विद्यानिकेतन, सेंट मेरीज, सर्वोदय खानापूर, कनक मेमोरियल, भरतेश, जी.जी. चिटणीस, गजाननराव भातकांडे, अमृता विद्यालय, ज्ञानप्रबोधन मंदिर, एमव्हीएम, लव्हडेल, केंद्रीय विद्यालय, सेंट पॉल्स आदी संघाना निमंत्रीत करण्यात आले आहे. यावेळी 6 सप्टेंबरला अंतिम सामना रंगणार आहे, असे सांगून त्यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. संस्थेचे व्यवस्थापक सायमन फर्नांडीस, प्राचार्य सॉवियो अॅब्रू, सॅबेस्टीयन परेरा, अनिकेत क्षेत्रीय, रजनीश तडकोडकर, गोविंद केरकर, रॉयस्टन जेम्स, अँथोनी डिसोजा आदी मान्यवरांच्या हस्ते चषकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी विनायक धामणेकर, परेश मुरकुटे, इम्रान सनदी, तन्वीर अष्टेवाले, जिमी सिंग, दिनेश पतकी, मॉन्टी सिंग आदी सभासद उपस्थित होते.