108 फूट उंचीचा पुतळा : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पार पडला सोहळा : अद्वैतलोकाच्या कार्याचा शुभारंभ
वृत्तसंस्था /ओंकारेश्वर
तीर्थनगरी ओंकारेश्वर येथे जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या 108 फूट उंचीच्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’चे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते गुरुवारी अनावरण झाले आहे. नर्मदा नदीच्या काठावर हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. ओंकारेश्वर येथे शंकराचार्य यांनी 4 वर्षे वास्तव्य केले होते. पुतळ्याचे अनावरण करण्यापूर्वी शिवराज सिंह यांनी सपत्नीक पूजा केली. तसेच पुतळ्याच्या अनावरणानंतर संतांसोबत पुतळ्याभवती प्रदक्षिणा घातली आहे. श्री शंकर भगवत्पाद सनातन वैदिक संस्कृतीचे सर्वोच्च प्रतिमान आहे. धर्म-संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. ज्ञानभूमी ओंकारेश्वर येथून त्यांच्या विचारांचे लोकव्यापीकरण व्हावे आणि संपूर्ण जगाने एकात्मतेच्या सार्वभौमिक संदेशाला आत्मसात करावे असे उद्गार शिवराज सिंह चौहान यांनी काढले आहेत.
शंकराचार्य यांनी वयाच्या 12 व्या वर्षी ओंकारेश्वरमधूनच अखंड भारतात वेदांतच्या लोकव्यापीकरणासाठी प्रस्थान केले होते. याचमुळे ओंकारेश्वरच्या मान्धाता पर्वतावर आदि शंकराचार्य यांचा पुतळा निर्माण करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 108 फुटांचा पुतळा उभा राहिला असून उर्वरित कार्ये लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. मध्यप्रदेश सरकारकडून अद्वैत वेदांतचे जागतिक केंद्र म्हणून ओंकारेश्वरला विकसित केले जात आहे. ओंकारेश्वर ही आदि शंकराचार्य यांची दीक्षाभूमी आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अद्वैत लोकची स्थापना केली जाणार आहे. तसेच वाटिका, वैदिक संस्थेची स्थापना, संग्रहालय, पुस्तकालय, लाइट अँड साउंड शो, नौकाविहार इत्यादी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. तसेच येथे पारंपरिक गुरुकुल स्थापन केले जाणार आहे. संपूर्ण निर्मिती भारतीय मंदिर स्थापत्यशैलीत केली जात आहे. हा प्रकल्प पर्यावरणस्नेही असणार आहे. अद्वैत लोकसोबत 36 हेक्टरमध्ये अद्वैत वन विकसित करण्यात येणार आहे. हा पूर्ण प्रकल्प 33 एकरमध्ये निर्माण केला जात आहे. आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या निर्मितीत सोलापूर येथील प्रसिद्ध मूर्तिकाराचे योगदान आहे.