बागवाडा येथील स्थानिकांकडून प्रकल्पास विरोध, दोन गटांत शाब्दिक बाचाबाची, पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात, ग्रामसभा आटोपती घेण्याचा प्रसंग
प्रतिनिधी /कुडचडे
पंचायत निवडणूक होऊन नवीन मंडळ निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच सावर्डे पंचायतीने बोलाविलेल्या ग्रामसभेत बागवाडा येथील स्थानिकांनी नियोजित गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करत मांडलेल्या विषयामुळे दोन गटांत बाचाबाची झाली. त्यामुळे कुडचडे पोलिसांचे सहकार्य घेऊन ग्रामसभा थोडक्मयात संपविण्याचा प्रसंग आला.
यावेळी सरपंच चिन्मयी नाईक, उपसरपंच नीतेश भंडारी, पंच संजय नाईक, शशिकांत नाईक, उन्नती वडार, सिद्धी पाऊसकर, गोकुळदास नाईक, नीलेश तारी, दीपक सावंत, पंचायत सचिव शशांक देसाई तसेच सांगे गटविकास अधिकारी कार्यालयातून निरीक्षक म्हणून रोहन नाईक उपस्थित होते. ग्रामसभेत सुरुवातीला सचिव शशांक देसाई यांनी आर्थिक अहवाल वाचून दाखविला. त्यानंतर ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांत बागवाडा येथे येणार असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाचा विषय आला.
स्थानिकांनी सदर प्रकल्पाला विरोध दर्शविलेला असून प्रशासकाच्या कारकिर्दीत त्याला देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्याचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. त्यावर सदर जागेचे मालक राजेंद्र नाईक यांनी आक्षेप घेत हा मुद्दा ग्रामसभेत कसा घेतला, तो न्यायालयात घेतला गेला पाहिजे असा मुद्दा मांडल्यानंतर प्रश्न मांडलेल्या गटाने त्यास आक्षेप घेत गोंधळ माजविला व मांडलेल्या विषयावर उत्तर द्यावे, अशी मागणी केली. दोन्ही गटांत अंदाजे अर्धा तास शाब्दिक बाचाबाची झाल्यावर पोलिसांचे सहकार्य घेऊन त्यांना शांत करण्यात आले.
कायदेशीर सल्ला घेणार : सरपंच
ग्रामसभेनंतर सरपंच चिन्मयी नाईक यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, आजच्या ग्रामसभेत जे विषय मांडण्यात आले आहेत त्यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार. ग्रामसभेत पुन्हा गोंधळ झाल्यामुळे उपसरपंच, पंच, पंचायत सचिव यांच्या सहमतीने बैठक संपविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामसभेत स्थानिकांनी मांडलेला विषय ऐकून घेण्याचे काम पंचायत सदस्यांचे असते. त्याप्रमाणे सरपंच व इतर सदस्यांनी तो ऐकून घेऊन यावर कायदेशीर सल्ला घेण्यात येणार. पंचायतीसाठी प्रत्येक व्यक्ती समान आहे. कोणालाच अडचणी येणार नाहीत अशा प्रकारे निर्णय घेण्याचा पंचायतीचा प्रयत्न असेल, असे बागवाडाच्या पंच सिद्धी पाऊसकर यांनी आपले मत मांडताना स्पष्ट केले.
पंचायतीला दिले होते निवेदन
बागवाडा येथील स्थानिक विठ्ठल आवदियेंकर यांनी ग्रामसभेत बोलताना सांगितले की, याअगोदर सदर जागेत आधीच्या जमीनमालकांकडून अन्य एक प्रकल्प उभा राहणार होता. तेव्हा त्यांनी दीर्घकाळापासून तेथे राहत असलेल्या लोकांसाठी 6 मीटर रस्ता व पारंपरिक पद्धतीने होत असलेल्या श्री राखणदेवाच्या धार्मिक कार्यांसाठी जागा सोडण्यात येणार, असे ठामपणे सांगितले होते. त्यानंतर सदर प्रकल्प झालाच नाही. हल्लीच गणेश चतुर्थीच्या पूर्वी सदर जागा मूळ मालकांकडून राजेंद्र नाईक यांनी विकत घेतली व त्या जागेवर बहुमजली इमारती उभारण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामुळे पुढे होणार असलेल्या अडचणींची जाणीव करून देण्यासाठी येथील स्थानिकांनी सावर्डे पंचायतीला निवेदन दिले होते व पंचायतीत चर्चा करून त्यावर ‘नोटेड’ म्हणून नोंदही करण्यात आली होती, असे आवदियेंकर यांनी सांगितले.
प्रशासकाच्या कारकिर्दीत परवानगी
पंचायत मंडळांचा कार्यकाळ संपल्यामुळे सर्व पंचायती प्रशासकांच्या हाती देण्यात आल्या होत्या. त्या काळात आम्हा सर्वांच्या निवेदनाला कोणतेच महत्त्व न देता आणि कोणालाच विश्वासात न घेता सदर प्रकल्पाला परवानगी देण्यात आली, असा दावा आवदियेंकर यांनी केला. सध्या त्या भागात राहत असलेल्या लोकांना येण्या-जाण्यासाठी सोयीस्कर असा रस्ता व अगोदर सांगितल्याप्रमाणे देवकार्ये करण्यासाठी सोयीस्कर जागा सोडावी इतकीच या प्रकल्पासंबंधी स्थानिकांची मागणी आहे. तसेच या ठिकाणी एवढा मोठा प्रकल्प उभारण्यापेक्षा प्लॉट्स पाडून घरे बांधल्यास स्थानिकांना कोणताच आक्षेप नाही, अशी माहिती आवदियेंकर यांनी यावेळी दिली.
इमारतीमुळे कचरा वाढणार
अशा इमारतीमुळे परिसरात कचऱयाची समस्या वाढणार. सावर्डे पंचायतीत आधीच कचरा विल्हेवाटीसाठी व्यवस्था नसल्यामुळे याअगोदर सावर्डे परिसरात बांधण्यात आलेल्या इमारतींतील लोकांकडून त्यांचा कचरा शारदा इंग्लिश हायस्कूलच्या जवळ असलेल्या ओहोळात रात्रीच्या वेळेस फेकण्याचे प्रकार घडत असतात. अशा अडचणींना स्थानिकांना सामोरे जावे लागू नये म्हणून या गृहनिर्माण प्रकल्पाला सर्वांचा विरोध आहे, असे आवदियेंकर यांनी सर्वांसमोर स्पष्ट केले.
कचरा प्रकल्प का वापरात नाही ?
सुमारे एक वर्ष अगोदर पंचायतीजवळच्या जागेत एक कोटी रुपयांच्या मिनी कचरा प्रकल्पाचे संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून उद्घाटन करून घेतले होते. त्या प्रकल्पाचा सावर्डे पंचायत अजूनपर्यंत का उपयोग करत नाही, असा प्रश्न स्थानिक रहिवासी संकेत भंडारी यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना पंच संजय नाईक यांनी सदर प्रकल्पातील त्रुटी समोर ठेवल्या. हा विषय निवडण्यात आलेल्या नवीन समितीसमोर मांडून योग्य तो निर्णय घ्यावा, असे सरपंचांनी स्पष्ट केले.
मासळी बाजारामुळे अपघाताचा धोका सावर्डे पंचायत परिसरात सुरू असलेला बेकायदेशीर मासळी बाजार धोक्मयाच्या ठिकाणी आहे. याची जाणीव सर्वांनाच असेल. पण त्याबर उपाययोजना करण्यासाठी सावर्डे पंचायत का तयार होत नाही, असा प्रश्न श्याम भंडारी यांनी मांडला. पंचायत सदर ठिकाणी अपघात होण्याची वाट बघत आहे का याचे उत्तर द्यावे अन्यथा कायदेशीर व सर्वांना सोयीस्कर अशा जागेवर सदर बाजार स्थलांतरित करावा. सदर ठिकाणी एखादा मोठा अपघात घडला, तर पंचायत त्याची जबाबदारी घेईल का. घेणार असल्यास तसे लेखी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पूर्ण ग्रामसभा पोलीस बंदोबस्तात पार पडली.