नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून एरिक गार्सेटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नावाचा प्रस्ताव बुधवारी ठेवण्यात आला होता. त्यांच्या नावाला अमेरिकेच्या वरीष्ठ लोकप्रतिनिधीगृहाने (सिनेट) गुरुवारी संमती दिली. हे पद गेली दोन वर्षे रिक्त होते. आता भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ होत असताना भारतात पूर्णवेळ राजदूत नियुक्त करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला असून तो महत्वाचा मानण्यात येत आहे. एरिक गार्सेटी हे अमेरिकेच्या लॉस एंजल्स या शहराचे माजी महापौर आहेत. त्यांच्याआधी केनिथ जेस्टर हे अमेरिकेचे भारतातील राजदूत होते. त्यांना जानेवारी 2021 मध्ये माघारी बोलाविण्यात आले होते. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षपदी जोसेफ बायडेन यांची निवड झाल्यानंतर त्यांनी या पदासाठी गार्सेटी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र सिनेटमध्ये डेमॉपेटिक पक्षाला बहुमत नसल्याने त्यांच्या नियुक्तीला सभागृहाची मान्यता मिळाली नव्हती. ते लॉस एंजल्सचे महापौर असताना त्यांनी त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱयावर लैंगिक शोषणाचा आरोप असताना त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही, असा त्यांच्यावर आरोप होता. त्यांची नियुक्ती रखडण्याचे हे देखील एक कारण होते. मात्र, आता बहुमतचा प्रश्न सुटल्याने त्यांच्या नावाचा प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. ते लवकरच पदभार स्वीकारतील. त्यांच्या नियुक्तीचे स्वागत भारताने केले आहे.