रशियातील प्रवाशांच्या मदतीसाठी मुंबईहून विशेष विमान रवाना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, मॉस्को
एअर इंडियाचे एआय-173 हे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे विमान इंजिनातील बिघाडामुळे वैमानिकांनी रशियाकडे वळवले. नवी दिल्लीहून अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे रशियातील मगदान विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 216 प्रवासी आणि 16 कर्मचारी होते. रशियात अडकलेल्या विमानातील प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी भारतातून एक खास विमान रशियाला रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, रशियातील विमानतळ तंत्रज्ञांकडून विमानातील बिघाडाचा तपास केला जात आहे.
मगदान विमानतळावर ते सुखरूप उतरवण्यात आल्याची माहिती टाटा समुहाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या वतीने जारी प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई येथून रशियातील मगदानसाठी बुधवारी दुपारी एक वाजता विशेष विमान रवाना करण्यात आल्याचेही एअर इंडियाच्या वतीने सांगण्यात आले. विमानात अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक पातळीवर सर्व मदत पोहोचवली जात असल्याचे एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, अमेरिकेतून आलेल्या वृत्तानुसार, अमेरिका प्रशासन रशियात उतरण्यात आलेल्या भारतीय विमानाचे सर्व अपडेट घेत आहे. रशियाचे युव्रेनसोबत युद्ध सु रू असल्यामुळे अमेरिका आणि युरोपीय युनियनकडून रशियावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीर या घटनेकडे अतिशय दक्षपणे पाहिले जात आहे.
अडचणींचा सामना
मगदानमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांना रशियामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. येथे प्रवाशांना जेवणाच्या नावाखाली सूप आणि रोटी देण्यात आली. तसेच सर्व प्रवाशांना जमिनीवर झोपावे लागले. हे प्रवासी मंगळवारी नवी दिल्लीहून एअर इंडियाच्या विमानाने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोसाठी निघाले होते. आता प्रवाशांना सॅन फ्रान्सिस्कोला नेण्यासाठी एअर इंडियाचे विमान मुंबईहून रवाना झाले आहे.
प्रवाशाकडून व्हिडीओ शेअर
मगदानमध्ये अडकलेल्या प्रवाशांपैकी एका प्रवाशाने हा व्हिडीओ शेअर करत प्रवाशांना होत असलेल्या समस्यांची माहिती दिली. इथे फक्त सीफूड आणि मांसाहारी पदार्थ मिळत असल्यामुळे शाकाहारी लोकांना फक्त रोटी आणि सूप देण्यात आले. रात्री लोकांना जमिनीवर गादी टाकून झोपावे लागले. एका खोलीत 20 लोकांना ठेवण्यात आले होते. टॉयलेट आणि बाथरूमची सुविधाही चांगली नाही, अशी माहिती एका प्रवाशाने शेअर केल्यानंतर त्यांना सुविधा पुरविण्यासाठी एअर इंडिया प्रशासनाकडून पावले उचलण्यात आली. सध्या कंपनीने रशियन सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे.