दमास्कस / वृत्तसंस्था
अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेच्या सीरियातील म्होरक्मयाचा (कमांडर) खात्मा करण्यात आला. माहेर अल-अगल असे ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. तो सीरियातील इस्लामिक स्टेटचा प्रमुख होता. हल्ल्याच्या वेळी माहेर अल-अगल त्याच्या एका साथीदारासह मोटरसायकलवर होता, असे पेंटागॉन सेंट्रल कमांडचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल डेव्ह ईस्टबर्न यांनी सांगितले. सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर हय़ुमन राईट्सने तो अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याची पुष्टी दिली आहे.
सीरियातील जिंदियारीजवळ करण्यात आलेल्या हल्ल्यात माहेर अल-अगर ठार झाला. तर त्याचा एक साथीदार गंभीर जखमी झाला. माहेर अल-अगल हा आयएसआयएसच्या प्रमुख चार नेत्यांपैकी एक असल्याचे यूएस आर्मी सेंट्रल कमांड सेंटकॉमच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले. या हल्ल्यामुळे आयएसआयएसची ताकद कमकुवत होईल. तसेच दहशतवादी संघटना आपले मनसुबे पूर्ण करू शकणार नसल्याचे अमेरिकन लष्कराचे कर्नल जो बुकीनो यांनी सांगितले.
पाच महिन्यांपूर्वी सीरियातील अतामे शहरात झालेल्या हल्ल्यानंतर पाच महिन्यांनी हा ड्रोनहल्ला झाला आहे. यापूर्वीच्या हल्ल्यात इस्लामिक स्टेटचा नेता अबू इब्राहिम अल-कुरेशी ठार झाला होता. कुरेशीने स्वतःला पकडले जाऊ नये म्हणून बॉम्बस्फोट केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अमेरिकन अधिकाऱयांनी सांगितले. 2019 मध्ये अमेरिकेने इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बकर अल-बगदादीला सीरियातील इदबिल येथे ठार केले. अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान पकडले जाऊ नये म्हणून त्याने स्वतःलाही उडवले. बगदादीचा जन्म 1971 मध्ये इराकमधील सामरा येथे झाला होता. तो 2003 मध्ये इराकमध्ये बंडखोर गटांच्या वतीने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढला होता. यादरम्यान पकडल्यानंतर 2005 ते 2009 पर्यंत त्याला कैद करण्यात आले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटची स्थापना केली होती.