वृत्तसंस्था /मॉस्को
चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिकेला लक्ष्य केले आहे. तैवानच्या मुद्द्यावर अमेरिका आगीशी खेळण्याचे काम करत आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिका तैवानचा वापर करत असला तरी त्याला यात कधीच यश मिळणार नसल्याचे शांगफू यांनी म्हटले आहे. तैवानला पुन्हा चीनमध्ये सामील होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. तैवान हा चीनचा अंतर्गत विषय असून यात आम्ही कुठल्याही त्रयस्थाचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे शांगफू यांनी नमूद केले आहे. तैवानचे उपाध्यक्ष विलियम लाई यांच्या अमेरिका दौऱ्यामुळे चीनचा जळफळाट सुरू आहे. चीनने लाई यांना ट्रबलमेकर म्हणजेच अडचणी निर्माण करणारा संबोधिले आहे. तैवान कुठल्याही धमकीला भीक घालणार नाही तसेच मागे हटणार नसल्याचे प्रत्युत्तर लाई यांनी चीनला दिले आहे. तैवानी नेत्यांच्या अमेरिका दौऱ्यावर चीनने नेहमीच आक्षेप घेतला आहे. विलियम लाई हे पुढील वर्षी तैवानमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीतील सर्वात प्रमुख दावेदार मानले जात आहेत. अशा स्थितीत लाई यांनी अमेरिकेशी जवळीक वाढवू नये यासाठी चीन प्रयत्नशील आहे. तैवान सुरक्षित असल्यास पूर्ण जग सुरक्षित राहणार असल्याचे लाई यांनी न्यूयॉर्कमध्ये स्वत:च्या समर्थकांना संबोधित करताना म्हटले आहे. तर अमेरिकेने चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.