वृत्तसंस्था/ पोर्ट्समाउथ
भारतीय संघाच्या सराव सत्रांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नवनवीन वाटा चोखाळण्यात आलेल्या आहेत आणि आता इंग्लंडमधील परिस्थिती लक्षात घेऊन ते बहुरंगी रबरी चेंडू घेऊन क्षेत्ररक्षणाचा सराव करू लागले आहेत. कारण तेथे अखेरच्या क्षणी चेंडू कसाही हवेत वळू शकतो आणि ते त्यांना महाग पडू शकते.
येथील अऊंडेल मैदानावर भारतीय संघाचा क्षेत्ररक्षणाचा सराव चालत असताना शुभमन गिल हिरव्या रंगाच्या रबरी चेंडूने झेल पकडण्याचा सराव करताना दिसला. पिवळ्या रंगाचे चेंडू देखील होते, परंतु ते लॉन टेनिसमध्ये वापरले जातात तसले नव्हते. असे चेंडू सहसा यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या जवळ राहणारे क्षेत्ररक्षक जेव्हा वेगाने येणारे झेल पकडण्याचा सराव करतात तेव्हा पाहायला मिळतात.
हे खास बनवलेले रबरी चेंडू आहेत. ते गल्ली क्रिकेटमध्ये पाहायला मिळत नाहीत. हे चेंडू क्षेत्ररक्षणाच्या सरावासाठी वापरले जातात. या चेंडूंना ’रिएक्शन बॉल्स’ असे नाव देण्यात आले आहे आणि ते केवळ काही विशिष्ट देशांमध्ये क्षेत्ररक्षण सरावासाठी वापरले जातात. यात प्रामुख्याने इंग्लंड किंवा न्यूझीलंडचा समावेश होतो. कारण येथे वारा आणि थंड परिस्थिती हे घटक असतात, असे एका प्रसिद्ध क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने सांगितले.
गिलला झेल पकडण्याचा सराव देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या चेंडूला काही महत्त्व आहे का असे विचारले असता त्याने सांगितले की, कोणत्याही विशिष्ट रंगामागे कोणतेही वैज्ञानिक किंवा क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वाचे कारण आहे असे मला वाटत नाही. पण झेल पकडण्याच्या सरावासाठी, विशेषत: स्लिपमधील क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षकासाठी अशा प्रकारचे रबरी चेंड वापरण्यामागे कारण नक्कीच आहे. इंग्लंडमध्ये ओलावा आणि हिरव्यागार बाह्याक्षेत्रामुळे चेंडू नेहमीपेक्षा जास्त वळतो, याकडे त्याने लक्ष वेधले.
इंग्लंड हा असा एकमेव देश आहे आणि काही प्रमाणात न्यूझीलंड, जेथे तुम्हाला असे आढळून येईल की, फलंदाजाला चकवून त्याच्या बॅटच्या बाहेरीला कडेजवळून जाणारे चेंडू मिळेल तसे वळतात. यामुळे चेंडू गोळा करणे किंवा पकडणे कठीण होते. इंग्लंडमधील ड्यूक्स चेंडूच्या बाबतीत तर हे आणखी जास्त प्रमाणात घडते, असे सदर प्रशिक्षकाने सांगितले. त्यानंतर हे रबरी ‘रिएक्शन बॉल’ प्रशिक्षणासाठी का वापरले जातात हे त्याने स्पष्ट केले. हे चेंडू वजनाने हलके असतात आणि त्यामुळे ते जास्तच वळतात आणि स्विंगही होतात, असे त्याने सांगितले.