13 लाख जनावरांचे उद्दिष्ट, घरोघरी राबविणार मोहीम
बेळगाव : राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आजपासून जिल्ह्यात लाळ्याखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला प्रारंभ होणार आहे. पशुसंगोपन खात्याच्या आवारात खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते या मोहीमेला चालना दिली जाणार आहे. प्राणघातक रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्रपणे राबविली जाणार आहे. चार वर्षांवरील गाय, बैल आणि म्हशींना लस टोचली जाणार आहे. पशुपालकांनी आपल्या जनावरांना लस टोचून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहनही खात्याने केले आहे. जिल्ह्यात 5 लाख 49 हजार 540 गोवर्गीय जनावारे, 8 लाख 44 हजार 717 म्हशी अशी एकूण 13 लाख 93 हजार 717 जनावरांपर्यंत लस पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सद्य परिस्थितीत 14 लाख 57 हजार 800 डोस खात्याकडे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान पशुवैद्यकीय दवाखान्यांकडे पाठविण्यात आले आहेत. संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन जनावरांना लस टोचणार आहेत. अलिकडे जनावरांना वेगवेगळ्या आजारांची लागण होवू लागली आहे. गतवर्षी लम्पीने 25 हजारांहून अधिक जनावरांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पशुसंगोपन खाते धास्तावले आहे. लाळ्याखुरकत रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.