चार वर्षांवरील सर्व जनावरांना लस, घरोघरी राबविणार मोहीम : सहकार्य करण्याचे पशुसंगोपन खात्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात लाळ्याखुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या घरोघरी जावून चार वर्षांवरील सर्व जनावरांना ही लस टोचली जाणार आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना लस घेवून सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याने केले आहे.
सप्टेंबरपासून जिल्ह्यात लम्पी रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे लाळ्याखुरकत लसीकरण मोहीम लांबणीवर पडली होती. दरवर्षी जून आणि सप्टेंबर अशी दोन टप्प्यात ही मोहीम राबविली जाते. मात्र यंदा लम्पीमुळे सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम काहीशी लांबणीवर पडली आहे. मात्र अधिवेशन संपल्यानंतर जानेवारीच्या पूर्वार्धात ही मोहीम हाती घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात 28 लाख जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, गाढव, डुकर, घोडा, कुत्रा, मांजर आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, म्हैस आणि बैलांना ही लस टोचली जाणार आहे. सध्या लम्पी विषाणूजन्य रोगाने थैमान माजविले आहे. त्यामुळे या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी खात्याची धडपड सुरू आहे. जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव कमी होवू लागला आहे. त्यामुळे आता लाळ्या खुरकत प्रतिबंधक लस हाती घेतली जाणार आहे.
मागील दोन वर्षात लाळ्या खुरकत लसीकरण मोहीम राबविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. कोरोनामुळे लसीकरण मोहिमेत अडचणी निर्माण झाल्या होत्या. घरोघरी ही मोहीम राबविताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागली होती. मात्र यंदा ही मोहीम अधिक तीव्रपणे आणि जलद राबविली जाणार आहे. शासनाकडून प्रतिबंधक लस उपलब्ध होताच जिल्ह्यात सर्वत्र लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.
लाळ्या खुरकत हा विषाणूजन्य धोकादायक रोग असून याची लागण झाल्यास जनावर अशक्त बनून दूध क्षमताही कमी होते. रोगाची तीव्रता वाढल्यास जनावर दगाविण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रतिबंधक लस घेवून या रोगाला आळा घालावा, असे आवाहन खात्याने केले आहे..
येत्या जानेवारीच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात लाळ्या खुरकत प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. लम्पीमुळे ही लसीकरण मोहीम लांबणीवर पडली होती. शासनाकडून प्रतिबंधक लसीचा पुरवठा होताच जिल्ह्यात सर्वत्र अधिक तीव्रपणे ही मोहीम राबविली जाणार आहे.
– डॉ. राजीव कुलेर, सहसंचालक पशुसंगोपन खाते