गेटच्या आत आंदोलन करण्यास मज्जाव करत वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याने करण्यात आला निषेध, फेब्रुवारी अखेर मागण्या मान्य न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा
राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी येथे सहायक वनसंरक्षक आणि वन्यजीव कार्यालयाच्या गेट समोर वन्यजीव पुनर्वसन ग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी राधानगरी अभयारण्य पुनर्वसन कमिटी एजीवडेच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आले,आंदोलकाना गेटच्या आत आंदोलन करू न दिल्याने आणि निवेदन स्वीकारण्यास वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने निषेध व्यक्त केला,फेब्रुवारी अखेर मागण्यांची पुर्तता न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
राधानगरी अभयारण्य विस्तारासाठी पुनर्वसित झालेल्या एजीवडे,न्यू करंजे,दाऊदवाडी आदी गावातील पुनर्वसनाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामधील अभ्यारण्यग्रस्त दाखले मिळावेत ग्रामपंचायत नोंद असलेल्या घरटान उताऱ्यानुसार मोकळी जागा मोबदला मिळावा,सात बारावर नोंद असलेल्या खाजगी जमिनीचा मोबदला मिळावा, २०१३ साली अठरा वर्षे वय पूर्ण होण्यास काही महिने कमी असलेल्या मुलांना संकलन यादीमध्ये पात्र करण्यात यावे.भारत सरकार व्याघ्र संरक्षण प्राधिकरण २०२१ चा आदेश लागू करून १५ लाखांचे पॅकेज द्यावे आदींसह विविध दहा मागण्यांसाठी वन्यजीव कार्यालयासमोर पुनर्वसन ग्रस्तांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले, प्रशासनाने गेटच्या आत आंदोलन करण्यास मज्जाव केल्याने प्रशासनाचा निषेध करत राधानगरी फोंडा महामार्गाच्या बाजूला आंदोलन केले.