राज ठकरे ३ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर
ऑनलाईन टीम/तरुण भारत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथील सभेमध्ये मशिदीवरील भोंग्यांविषयी वक्तव्य करत ३ मे पर्यंत भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. तर ठाण्यातील सभेपासून राज्यातील वातावरण तापलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी राज ठाकरे ठाम आहेत. ३ मे रोजी भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम संपल्यानंतर राज्यभरात ४ मे नंतर महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी अनेक मनसैनिकांची धरपकड करण्यात आली होती. पण याचवेळी मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) तिरुपतीला गेल्याने आणि ते अनुपस्थित राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. पण वसंत मोरे आज कात्रज भागातील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. त्यामुळे वसंत मोरे मनसे सोडणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, वसंत मोरे कात्रज भागातील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. यामंदिराबाहेर स्टेजही उभारण्यात आलं आहे. मी तिरुपती बालाजीला असल्याने आरतीचे नियोजन झाले नव्हते. आज शनिवार असल्याने महाआरतीचे नियोजन केल्याची महिती मोरे यांनी दिली आहे. पोलिसांनी परवानगी दिली असल्याने घराजवळील हनुमान मंदिरात आरती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर वसंत मोरे यांच्याकडून आयोजित केलेल्या महाआरती ला राज ठाकरे उपस्थिती लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष्य असणार आहे.
महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पुन्हा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. (Raj Thackeray in Pune) पुण्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच मोरेंनी आरंभलेल्या महाआरतीला राज ठाकरे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.