प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव पोलिसांनी एका चोरटय़ाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अकरा मोबाईल फोन जप्त केले. सदर चोरटय़ाचे नाव महमद युसूफ हुसेन शेख (47) असे असून तो दावणगिरी कर्नाटक येथील रहिवासी आहे.
पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वाडे वास्को येथील निलकमल कुमार यांनी शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आपला मोबाईल बायणा समुद्र किनाऱयावर चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. मुरगांव पोलिसांनी मोबाईल चोरीप्रकरणी महमद युसूफ हुसेन शेख याला शुक्रवारी रात्री ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे अकरा मोबाईल सापडले. हे मोबाईल वेगवेगळय़ा कंपन्यांचे असून ते पोलिसांनी जप्त केले व त्याला अटक केली. या सर्व मोबाईलची किंमत सुमारे तीन लाख एवढी आहे. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुरगांव पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक स्टॅन्ली गोम्स अधिक तपास करीत आहेत.