अलीकडेच भारतामध्ये झालेल्या शिखर परिषद जी-20 च्या निमित्ताने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा शब्दप्रयोग संपूर्ण जगामध्ये एक चर्चेचा विषय होता. पण फारच कमी लोकांना याचा अर्थ काय अथवा या वाक्यामागील भावना काय आहेत याबद्दल जाणीव नाही. मूलत: हे वाक्य महोपनिषदमधील काही श्लोकांपैकी आहे. हा संपूर्ण श्लोक असा आहे, अयं निज: परोवेति गणना लघुचेतसाम् । उदारचरितानां तु वसुधैवकुटुम्बकम् (महोपनिषद्, अध्याय 6, मंत्र 71)
अर्थात ‘हे माझे व हे माझे नाही, किंवा हा माझा बंधू व हा माझा नाही, असा विचार केवळ संकुचित प्रवृत्ती असलेले लोक करतात. उदार हृदय असलेल्यांना सर्व पृथ्वीच कुटुंबासमान आहे.’ आपल्या संसदेच्या प्रवेश कक्षासमोर पण हे वाक्य कोरलेले आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा विचार सनातन धर्माचे मूळ आहे. म्हणून सनातन धर्मात सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती आहे. या श्लोकाचा संदर्भ असा आहे की, ज्या व्यक्तीने आध्यात्मिक प्रगतीची सर्वोच्च पातळी गाठली आहे आणि जो भौतिक संपत्तीच्या आसक्तीशिवाय आपली सांसारिक कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम आहे, अशा व्यक्तीच्या गुणधर्मांपैकी ही एक भावना आहे.
संत तुकाराम महाराज एका अभंगात ही वैश्विक भावना आणि आध्यात्मिक प्रगतीची सर्वोच्च पातळी कशी असावी हे प्रकट करताना म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।1।। आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ।।2।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।3।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ।।4।।
अर्थात ‘सर्व जग, त्यातील जीवित आणि जड वस्तू हे विष्णुमय आहेत, असे जाणणे हाच वैष्णवांचा धर्म आहे. भेदाभेद, मतभेद, वादविवाद हा केवळ अमंगळ (अशुभ) भ्रमच आहे. अहो, भागवत भक्त (भगवान विष्णूचे निस्सीम भक्त) तुम्ही माझे ऐका, वैष्णवांचे खरे लक्षण समजून घेऊन स्वत:चे हित करून घ्या. आपल्याकडून कोणत्याही जीवाचा द्वेष, मत्सर घडू देऊ नये, कारण सर्व ठिकाणी भगवंताचे अस्तित्व व्यापून आहे. हे जाणणेदेखील त्या सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या पूजेचे एक रहस्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत झाली तरी आपल्याला वेदना होतात, त्याप्रमाणे कोणत्याही जीवाचा (प्राणिमात्रांच्या) मत्सर केल्यास प्रत्यक्ष भगवंताचा मत्सर केल्यासारखे आहे, कारण सर्व जीव त्यांचे अंश आहेत.’
वैष्णवांच्या म्हणजे भगवान विष्णूच्या अथवा श्रीकृष्णभक्तांच्या समदृष्टीचे वर्णन या अभंगामध्ये तुकाराम महाराज करतात. हीच उदात्त भावना ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या विचारामागे आहे.
आज सर्वत्र आपण पाहतो आहोत की समाज अनेक भेदभावनांनी त्रस्त झालेला आहे. समाजातील वैरभावना, एकमेकांविषयी द्वेष वाढत चालला आहे. जगामध्ये धर्माच्या नावावर लोक युद्ध करण्यास सज्ज आहेत. वर्णभेद, वंशभेद, लिंगभेद, राजकीय पक्षभेद, प्रांतभेद, भाषाभेद, संस्कृतीभेद, ‘मी श्रेष्ठ की तू’ ठरविण्यासाठी सर्वच क्षेत्रात स्पर्धा चालू आहे. अशा वेळी सर्वात पुढे जाण्यासाठी एकमेकांचे पाय ओढणे, फसवणूक करणे हे सर्वमान्य होत चालले आहे. सध्या समाज जगाच्या इतिहासात कधी नव्हे इतका गोंधळलेल्या अवस्थेत आहे. अशा भ्रमीत अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी भगवद्गीता आपल्याला मदत करते.
गीतेमध्ये सांगितले आहे, आपण शरीर नसून सच्चिदानंद आत्मा आहोत आणि भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत, हे साधे सरळ ज्ञान आपल्याला सर्व समस्यांतून मुक्त करते. आपले मूळ अस्तित्व ‘आत्मा’ आहे, हे विसरल्यास शरीरावर आधारित भेद निर्माण होतात आणि हेच भेद जगातील सर्व समस्यांचे मूळ आहे. या सर्व भेदाभेदातून मुक्त झाल्याशिवाय आपल्याला वैयक्तिक जीवनापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत शांती, समाधान प्राप्त होणे शक्य नाही. आपण ‘आत्मा’ असून भगवंताचा अंश आहोत, हे जी व्यक्ती जाणते ती शारीरिक स्तरावर कोणताही भेदभाव करीत नाही. शारीरिक भावनेतूनच द्वेष, मत्सर उत्पन्न होतो. तथापि, वैष्णव सर्व जीवांकडे समदृष्टीने पाहतो. तो कोणताही शारीरिक भेद करीत नाही. अशा व्यक्तीला शास्त्रामध्ये पंडित, ज्ञानी, महात्मा, ब्राह्मण म्हणून संबोधले आहे. भगवद्गीतेमध्ये (5.18) विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।। सांगितले आहे, अर्थात ‘विनम्र साधुव्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे, विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वाना समदृष्टीने पाहते.’
सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती इत्यादी भिन्न असतील, पण ज्ञानी व्यक्तीच्या दृष्टीने हे वरवरचे दिसणारे शारीरिक भेद निरर्थक आहेत. कारण सर्वजण भगवंताशी संबंधित आहेत. ज्याप्रमाणे भगवंत सर्व प्राणिमात्रांशी प्रेमाने वागतात, त्याचप्रमाणे वैष्णवदेखील सर्व जीवांचा द्वेष न करता प्रेमाने वागतात. आपल्या शरीरात हातपाय, डोळे, नाक, कान इत्यादी निरनिराळे भाग आहेत, कोणत्याही एका अवयवाला दुखापत झाली तर त्या व्यक्तीला वेदना होतात. त्याप्रमाणेच कोणत्याही जीवाचा द्वेष केल्यास तो प्रत्यक्ष भगवंताचा द्वेष करणे होय. आपण भगवंताची सेवा जशा प्रकारे करतो तशा प्रकारे काळजीपूर्वक भगवंताचे अंश असलेल्या जीवांशी बुद्धिमान व्यक्तींनी व्यवहार करावा, ही अपेक्षा असते. अशा रीतीने आपण समजू शकतो की भगवान श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे पिता आहेत. या ज्ञानावर आधारित आपण इतरांशी व्यवहार केला तर समाजामध्ये संघर्ष होणार नाही.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ सर्व जगातील जीव माझे कुटुंबीय आहेत असे जर असेल तर कुटुंबप्रमुखही असावयास हवा. याअर्थी आपण सर्व जीव भगवान श्रीकृष्णाचे अंश असल्याने आपले पिता या अर्थाने श्रीकृष्ण आपले कुटुंबप्रमुख आहेत. स्वत: भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 14,4) सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तय: सम्भवन्ति या: । तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रद: पिता ।। अर्थात ‘हे कौंतेय ! भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे’ या भावनेने सर्व जग एकत्र राहत होते पण कलियुगामध्ये अनेक देश निर्माण झाले आणि ही संस्कृती खंडित झाली आणि आज एका घरातील लोकसुद्धा शांततेने आणि सामंजस्याने राहू शकत नाहीत. कारण आपण विसरून गेलो आहोत की आपण आत्मा आहोत आणि भगवंताचे अंश आहोत. पण महात्मा व्यक्तीची दृष्टीही सर्वोच्च असते. अशा महात्माचे वर्णन श्रीमद भागवतमध्ये केले आहे (भा 5.5.2) महान्तस्ते समचित्ता: प्रशान्ता विमन्यव: सुहृद: साधवो ये ।। अर्थात ‘महात्मे समचित्त असतात, ते दोन जीवांमध्ये भेद करीत नाहीत, ते पूर्णपणे शांत आणि भक्तिमय सेवेमध्ये रमलेले असतात आणि इतरांच्या कल्याणासाठी कार्य करीत असतात. ते कोणत्याही प्रकारचे घृणास्पद कार्य करीत नाहीत. त्यांच्यामध्ये असलेल्या या गुणांमुळे ते महात्मा म्हणून ओळखले जातात ‘अशा महात्मामध्ये कोणताही दुजाभाव असत नाही त्यामुळे ते सर्व जीवांना आपले नातेवाईक समजतात. तुकाराम महाराजसुद्धा आपल्या पत्नीला उपदेश करताना सांगतात, देवासाठी झाले आम्हा ब्रह्मांड सोयरे । म्हणजे विठ्ठलाच्या संबंधाने सर्व जगातील लोक आपले नातेवाईक बनलेत.
वैदिक संस्कृतीमध्ये सर्व जग हे एक कुटुंब मानले गेले आणि सर्वांच्या उद्धारासाठी सर्वजण प्रयत्न करीत असत. यासाठी आणखी एक अशीच प्रार्थनाही प्रसिद्ध आहे. ॐ सर्वे भवन्तु सुखिन: । सर्वे सन्तु निरामया: । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चित् दु:ख भाग्भवेत् ।। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।। अर्थात, सर्वजण सुखी होवोत, सर्वजण आरोग्यसंपन्न होवोत, सर्वांना स्व-कल्याण दिसू देत, कुणालाही दु:खी व्हायला लागू नये, सर्वत्र शांती नांदो. अशा प्रकारे भारतीय अथवा वैदिक संस्कृतीतील उदात्त भावना भारताने सर्व जगाला दिली आणि आजही जगातील लोक या भावनेने भारताकडे पाहतात आणि येथील वैदिक संस्कृतीचा स्वीकार करतात.
-वृंदावनदास