आरटीओ कार्यक्षेत्रात वर्षभरात 5 हजारांहून अधिक महिलांनी घेतला वाहन परवाना
दीपक बुवा/ बेळगाव
महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात पुढे पाऊल टाकत आहेत. वैद्यकीय, तंत्रज्ञान, संशोधन, राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठसा उमटवित असताना स्वत:च्या पायावर उभे राहण्याकडे त्यांनी पसंती दिली आहे. पुरुषांप्रमाणेच दुचाकी, चार चाकी व अवजड वाहने चालविण्याकडेही महिलांनी भर दिला आहे. आरटीओमधून महिलांनी घेतलेल्या चालक परवान्यावरून हे स्पष्ट दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात विविध वाहन परवान्यासाठी तब्बल 6 हजार महिलांनी अर्ज केला होता. त्यापैकी 5 हजारहून अधिक महिलांना वाहन परवाना देण्यात आला.
निर्बंध झुगारून रोवला झेंडा
काही वर्षांपूर्वी महिलांना घराबाहेर पडणे कठीण होत होते. त्यांच्यावर लादण्यात आलेले निर्बंध पाहता महिलांनी कोणत्याच क्षेत्रात प्रगती करू नये, अशी मानसिकता रुढ होती. त्याला झुगारून आता स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा रोवला आहे. बेळगाव आरटीओ कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातून तब्बल 5 हजारहून अधिक महिलांनी वाहन परवाना घेतला आहे. यामध्ये दुचाकी व चार चाकी वाहन परवाने अधिक आहेत. अवजड वाहतूक वाहन परवान्यासाठी काही महिलांनी परवाना काढला असल्याचे सांगण्यात आले.
कौतुकास्पद बाब
बेळगाव आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार आता ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळे वाहन परवाना काढणे, कर भरणे, विमा भरणे ही सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. सरकारने दिलेले उद्दिष्ट नुकतेच बेळगाव कार्यालयाने पूर्ण केले आहे. वाहन परवाना काढण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे गर्दी होत नसली तरी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कच्चा वाहन परवाना दिला जातो. त्यानंतर 40 दिवसांनी पुन्हा वाहन चालवून नियमांची माहिती दिल्यानंतर पक्का वाहन परवाना देण्यात येतो. आरटीओ कार्यक्षेत्रात महिन्याकाठी 400 ते 450 महिला वाहन परवाना काढत आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे सांगण्यात आले. मागील वर्षभरात म्हणजे 2022-23 मार्चअखेर 5 हजार 323 महिलांनी वाहन परवाना काढला आहे. नोव्हेंबर महिन्यात महिलांनी सर्वाधिक म्हणजेच 599 वाहन परवाने काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात सर्वात कमी म्हणजे 363 वाहन परवाने काढले आहेत. अवजड वाहतुकीसाठी 5 महिलांनी वाहन परवाना काढला आहे. रिक्षा चालविण्यासाठी मात्र अजून एकाही महिलेने वाहन परवाना काढल्याची नोंद नाही.
वर्षभरात 28 हजार जणांनी घेतला वाहन परवाना
मागील वर्षभरात स्त्राr व पुरुषांनी मिळून 28 हजार 632 जणांनी वाहन परवाना घेतला आहे. अजूनही काही जणांनी ऑनलाईन अर्ज केले असून त्यांची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, यावर्षी 30 हजारांहून अधिक जणांना वाहन परवाना देण्यासाठी आरटीओ अधिकारी प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाईनमुळेच महिलांना प्राधान्य
आरटीओ कार्यालयातील सर्व व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. त्यामुळेच महिलांनाही प्राधान्य मिळाले आहे. ज्या महिलांनी वाहन परवाना काढला आहे त्यातील अधिकतर महिलांनी परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. कच्चा वाहन परवाना दिल्यानंतरच त्यांनी पक्क्या वाहन परवान्यासाठी अर्ज केला होता. ऑनलाईनमुळेच महिलांना प्राधान्य मिळाले.
प्रत्येक चालकाला वाहन परवाना महत्त्वाचा
मागील वर्षभरात 5 हजार महिलांनी वाहन परवाना काढला आहे. यामध्ये आता वाढ करण्याची गरज आहे. अजूनही अनेक महिलांनी वाहन परवाना काढून घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत. कारण अपघात घडल्यास वाहन परवाना गरजेचा असतो. त्यामुळे प्रत्येकाने वाहन परवाना काढणे महत्त्वाचे आहे.
– नागेश मुंडस्, आरटीओ
2022-23 मध्ये महिलांनी काढलेले वाहन परवाने
- महिना महिला वाहन परवान्यांची संख्या
- एप्रिल 408
- मे 447
- जून 438
- जुलै 492
- ऑगस्ट 413
- सप्टेंबर 496
- ऑक्टोबर 428
- नोव्हेंबर 599
- डिसेंबर 365
- जानेवारी 447
- फेब्रुवारी 363
- मार्च 427