पीडीओच्या बदलीवरून आजी-माजी आमदारांची एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार
कारवार : कारवार तालुक्यातील माजाळी ग्रामपंचायतीचे पीडीओ यांच्या बदलीवरून कारवार-अंकोलाच्या आमदार रूपाली नाईक आणि माजी आमदार सतीश कृष्णा सैल यांच्या दरम्यान निर्माण झालेला वाद आणि शाब्दिक चकमकी विकोपाला गेल्याने आजी-माजी आमदारांनी एकमेकाविरोधात कारवार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमदार नाईक यांनी आपणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार सतीश सैल यांनी दाखल केली आहे. तर सतीश सैल यांनी आपणाला वडिलांवरून शिवीगाळ केली, अशी तक्रार रुपाली नाईक यांनी केली आहे. ही घटना शुक्रवारी कारवार जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यदर्शी ईश्वर कांदू यांच्या कार्यालयात घडली. रु पाली नाईक आणि सतीश सैल एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एकाचवेळी कारवार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात हायड्रामाचे वातावरण निर्माण झाले होते. लेखी स्वरुपात आमदार नाईक यांच्या विरोधात दिलेली तक्रार जोपर्यंत नोंदवून घेतली जात नाही असे स्पष्ट करत माजी आमदार सैल आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याच्या पायरीवर ठाण मांडल्याचे दिसून आले.
कारवार तालुक्यातील माजाळी ग्राम पंचायतीच्या पीडीओ म्हणून यापूर्वी साधना चंडेकर सेवा बजावत होत्या. चंडेकर यांची अन्यत्र बदली करून त्यांच्या जागी अरुणा यांची नियुक्ती केली आहे. तथापि अरुणा यांना कोकणी भाषा येत नाही, अशी तक्रार माजाळी ग्राम पंचायत अध्यक्ष आणि सदस्यांनी सतीश सैल यांच्याकडे केली. साधना चंडेकर यांच्या बदलीसंदर्भात दाद मागण्यासाठी सैल यांनी कारवार जिल्हा पंचायत मुख्य कार्यदर्शी यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी जिल्हा पालकमंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या मध्यस्थीखाली सुरू असलेल्या बैठकीत सहभागी झालेल्या रुपाली नाईक तेथे दाखल झाल्या. त्यावेळी आजी-माजी आमदारांच्या दरम्यान पीडीओंच्या बदलीवरून वाद निर्माण झाला. उभयतांच्या दरम्यान शाब्दीक चकमकी झाल्या. शाब्दीक चकमकीवेळी नाईक यांनी सैल यांचा मद्यपी असा एकेरी उल्लेख केला. सैल सकाळपासून रात्रीपर्यंत दारूच्या जगात वावरतात. पोलिसांनी सैल यांच्या वाहनांची झडती घेतल्यास त्यांच्या वाहनात दारूच्या बाटल्या आढळून येतील, असा शब्दप्रहार केला. यामुळे संतापलेल्या सैल यांनी रुपाली नाईक यांना उद्देशून दारू प्यायला मला काय तुझा बाप पैसे देतो, असे खडसावले. त्यावेळी रुपाली नाईक यांनी आपणावर पेपर वेट फेकण्याचा प्रयत्न केला. तथापि नाईक यांच्या समर्थकांनी तसे करण्यास त्यांना अडविले, असा आरोप सैल यांनी केला आहे.
एकाचवेळी पोलीस ठाण्यात दाखल
पुढे आजी-माजी आमदारांनी एकाचवेळी पोलीस ठाण्यात दाखल होऊन एकमेकांवर तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून आता हे प्रकरण काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आजी-माजी आमदारांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.