कॅस्पर रूड, कॅसात्किना, गॉफ, स्टिफेन्स यांचीही आगेकूच, मॅडिसन कीज पराभूत
वृत्तसंस्था/ पॅरिस
जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, सर्बियाचा नोव्हॅक जोकोविच, स्पेनचे राफेल नदाल व कार्लोस अल्कारेझ, रशियाची दारिया कॅसात्किना, अमेरिकेच्या कोको गॉफ व स्लोअर स्टीफेन्स यांनी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. मॅडिसन कीज, कॅरेन खचानोव्ह, दिएगो श्वार्ट्झमन, कॅमिला जॉर्जी यांचे तसेच मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले.
अलेक्झांडर व्हेरेव्हने बर्नबे मिरालेसचा 7-6 (13-11), 7-5, 6-3 असा पराभव केला. यातील पहिला सेट टायब्रेकरमध्येही बराच लांबला होता. मिरालेस या स्पर्धेत पहिल्यांदाच चौथ्या फेरीत खेळत होता. ही लढत दोन तास 45 मिनिटे रंगली होती. व्हेरेव्हने या सामन्यात 63 चुका केल्या. अल्कारेझविरुद्ध होणाऱया उपांत्यपूर्व लढतीत यावर व्हेरेव्हला सुधारणा करावी लागणार आहे. 13 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया स्पेनच्या नदालने उपांत्यपूर्व फेरी गाठताना नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेविरुद्ध संघर्ष करावा लागला. पाचव्या मानांकित नदालने ही लढत 3-6, 6-3, 6-2, 3-6, 6-3 अशी जिंकली. त्याची उपांत्यपूर्व लढत सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोविचशी होणार आहे. जोकोविचने अर्जेन्टिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा 6-1, 6-3, 6-3 असा पराभव केला. मागील वर्षी जोकोविचने नदालला उपांत्य फेरीत हरविले होते आणि नंतर सित्सिपसला हरवून जेतेपदही मिळविले होते. अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित अल्कारेझने दुसऱयांदा ग्रँडस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठताना कॅरेन खचानोव्हचा 6-1, 6-4, 6-4 असा सरळ सेट्सनी पराभव केला.
रूडची आगेकूच
नॉर्वेच्या कॅस्पर रूडनेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना पोलंडच्या हय़ुबर्ट हुरकाझचा चार सेट्समध्ये पराभव केला. 23 वर्षीय रूडने ही लढत 6-2, 6-3, 3-6, 6-3 अशी जिंकली. या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा रूड हा नॉर्वेचा पहिला टेनिसपटू आहे. त्याची पुढील लढत होल्गर रुने किंवा ग्रीसचा सित्सिपस यापैकी एकाशी होईल.
गॉफ, स्टीफन्स विजयी
महिला एकेरीत रशियाच्या 20 व्या मानांकित कॅसात्किनाने दुसऱयांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने इटलीच्या 28 व्या मानांकित कॅमिला जॉर्जीचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला. तिची लढत व्हेरोनिका कुडरमेटोव्हाशी होईल. 29 व्या मानांकित कुडरमेटोव्हाने अमेरिकेच्या मॅडिसन कीजचे आव्हान 1-6, 6-3, 6-1 असे संपुष्टात आणले. अमेरिकेचीच 18 वर्षीय युवा खेळाडू कोको गॉफनेही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले असून तिने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा 6-4, 6-0 असा धुव्वा उडविला. अमेरिकेच्याच स्लोअन स्टीफेन्सनेही आगेकूच केली असून तिने स्वित्झर्लंडच्या जिल टीचमनचा 6-2, 6-0 असा पराभव केला. तिसऱयांदा तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. 2018 मध्ये तिने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. तिची पुढील लढत कोको गॉफशी होणार आहे. 2015 मध्ये अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकदाही अमेरिकन खेळाडूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. मिश्र दुहेरीत भारताच्या सानिया मिर्झाचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले. इव्हान डोडिग व सानिया मिर्झा यांना दुसऱया फेरीच्या लढतीत ब्रुनो सोआरेस व बियाट्रिझ हदाद माइयाकडून 4-6, 3-6 असा पराभव स्वीकारावा लागला.