राज्यात पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचे छित्र आज सकाळपर्यंत स्पष्ट झाले. 2 पदवीधर मतदारसंघासाठी तर 3 शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने कमबॅक करून अमरावती पदवीधर, नागपूर शिक्षक मतदारसंघ आणि औरंगाबाद- मराठवाडा शिक्षक मतदार संघामध्ये 3 जागा मिळवल्या आहेत. तर भाजपला केवळ कोकण शिक्षक मतदारसंघाच्या 1 जागेवर समाधान मागावे लागले. तर नाशिक मतदार संघामधून सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून नाशिक विधानपरिषदेवर गेले आहेत.
पाहूया मतदारसंघनिहाय निकाल
नाशिक पदवीधर मतदारसंघ
नाशिक पदवीधार मतदारसंघात घडणाऱ्या राजकिय घडामोडीमोडींवर संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर शेवटी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्याच मुख्य लढत झाली. कॉंग्रसच्या अंतर्गत रजाकारणावर नारज असलेले आणि भाजपचा छुपा पाठींबा लाभलेले सत्यजीत तांबे हे आपले वडिल सुधीत तांबे यांच्या जागी आमदार होणार आहेत. तर भाजपच्या बंडखोर उमेदवार शुभांगी पाटील यांनी शेवटी शिवसेना आणि महाविकास आघाडीचा पाठींब्यावर लढत दिली. सत्यजीत तांबे हे 29,465 मतांच्या फरकाने निवडणून आले आहेत. तांबे यांना ६८,९९९ मते मिळाली तर शुभांगी पाटील यांना २९,४६५ मते मिळाली आहेत.
कोकण शिक्षक मतदारसंघ
महाविकास आघाडीच्या पाठींब्यावर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला आहे. म्हात्रे यांच्या विजयामुळे भाजप आणि शिंदे गटाने विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. पूर्ण तयारीने निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या ज्ञानेश्वर म्हात्रेंना शिंदे गटानेही सक्रिय पाठिंबा दिला होता. तर दुसरीकडे शेकापचे बाळाराम पाटील हे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या मदतीने म्हात्रे यांना आव्हान देत होते. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहील्या पसंतीची 20 हजारपेक्षा जास्त मते पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ 9 हजार 500 मते पडली आहेत.
नागपूर शिक्षक मतदारसंघ
नागपूरमध्ये आडबाले यांच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत नागपुरातील भाजपने गमावलेली ही दुसरी विधानमंडळाची जागा आहे. 2020 मध्ये पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी नागपूरचे माजी महापौर आणि फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांचा पराभव केल्यानंतर नागो गाणार यांच्या रुपात दुसरा धक्का भाजपला मिळाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांच्यापेक्षा दुप्पट मतं घेतली. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी सुधाकर आडबाले यांनी लक्षणिय लढा उभारला होता. सुधाकर आडबाले यांना १४ हजार ६१ मतं मिळाली, तर नागो गाणार यांना ६ हजार ३०९ मतं मिळाली. महाविकास आघाडी आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी खूप उशीर लावला होता. आडबाले आधीपासूनच सर्व तयारी करून होते. त्याचा अंदाज घेऊनच काँग्रेसने आणि महाविकास आघाडीने त्यांना अखेरच्या क्षणी पाठिंबा जाहीर केला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची गेल्या अनेक वर्षांची तयारी, जुनी पेन्शनचा भावनिक विषय आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा याशिवाय गाणारांबद्दलची अँटी इन्कमबन्सी हे आडबाले यांच्या विजयात महत्वाचे मुद्दे ठरले. आडबाले यांचा विजय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धक्का मानला जातोय.
अमरावती पदवीधर मतदारसंघ
अमरावती विधान परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे विजयी झाले असून त्यांनी भाजपाचे डॉ. रणजित पाटील यांचा ३ हजार ३६८ मतांनी पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत बाद फेरीच्या मतमोजणीअखेर धीरज लिंगाडे यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली तर डॉ. रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. विजयासाठी ४७ हजार १०१ इतका मतांचा कोटा असताना धीरज लिंगाडे हे कोटा पूर्ण करू शकले नाहीत, पण त्यांना पडलेल्या सर्वाधिक मतांच्या गणितावर ते विजयी ठरले आहेत.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ
शिक्षक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला. सलग चौथ्यांदा आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेणाऱ्या विक्रम काळे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या लढतीत विक्रम काळे यांना 23 हजार 580 मतं मिळाली. तर प्रतिस्पर्धी किरण पाटील यांना 16 हजार 643 मतं मिळाली आहेत. विक्रम काळे 6 हजार मतांनी निवडून आल्यानंतर ही त्यांच्याविषयी पक्षात असणारी नाराजी दिसून आली. त्यांच्या कार्यशैलीवर पक्षांतर्गत आणि शिक्षकांमध्येही असलेल्या नाराजीचे भाजपाला एकत्रिकरण करता आले नाही. काळेवर नाराज असलेली मते मराठवाडा शिक्षक संघांचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना मिळाली. चौथ्यांदा निवडून येणारे विक्रम काळे यांचा आता राष्ट्रवादीमध्ये यापुढे वरचष्मा असणार आहे.