वृत्तसंस्था/ हांगझाऊ
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात भारताची महिला बुद्धिबळपटू कोनेरु हंपीला पराभव पत्करावा लागला तर विदित गुजरातीने प्रतिस्पर्ध्यावर मात केली. द्रोणावली हरिकाने आपला डाव बरोबरीत सोडवला.
पुरुष आणि महिलांच्या वैयक्तिक बुद्धिबळ प्रकारातील सोमवारी झालेल्या महिलांच्या चौथ्या फेरीच्या लढतीत भारताच्या कोनेरु हंपीला चीनच्या इफेन होयुकडून 0-1 अशा गुणाने पराभव पत्करावा लागला. तर दुसऱ्या एका लढती भारताच्या द्रोणावली हरिकाने उझ्बेकच्या निलुफेर याकुबेवाला 0.5-0.5 असे बरोबरीत रोखले. पुरुषांच्या विभागात झालेल्या चौथ्या फेरीतील लढतीत विदित गुजरातीने व्हिएतनामच्या तुआन मिन लीचा 1-0 असा पराभव केला. भारताच्या अर्जुन कुमारने इराणच्या तेबाताबेईला 0.5-0.5 असे बरोबरीत रोखले.
महिलांच्या वैयक्तिक बुद्धिबळ प्रकारात भारताच्या कोनेरु हंपी आणि द्रोणावली हरिका यांनी दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या लढती जिंकल्या होत्या पण भारताच्या पुरुष बुद्धिबळपटूंना विजयावर शिक्कामोर्तब करता आला नाही. कझाकस्तानच्या नोजेरबेकने विदित गुजरातीवर मात केली होती. तर अर्जुन कुमारने व्हिएतनामच्या ली ला बरोबरीत रोखले. भारताच्या हरिका आणि हंपी यांनी वैयक्तिक प्रकारात आपल्या दुसऱ्या फेरीतील लढती जिंकल्या आहेत.
या क्रीडा प्रकारात मंगळवारी भारताचा हरिकाने तिसऱ्या फेरीतील लढतीत चीनच्या यिफेनला बरोबरीत रोखले पण कोनेरु हंपीला चीनच्या झु जिनेरकडून पराभव पत्करावा लागला. पुरुषांच्या विभागात भारताच्या अर्जुन कुमार आणि विदित गुजराती यांनी आपले डाव जिंकले. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे डी. गुकेश, विदित गुजराती, अर्जुन इरिगेसी, पी. हरिकृष्णा, आर. प्रग्यानंद, कोनेरु हंपी, डी. हरिका, आर. वैशाली, वंटिका अगरवाल आणि सविता श्री प्रतिनिधीत्व करीत आहेत.