विरोधकांकडून भाजप आमदाराच्या राजीनाम्याची मागणी
अगरताळा / वृत्तसंस्था
त्रिपुरा विधानसभेत भाजप आमदार जादबलाल नाथ यांचा पोर्न पाहतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, आपल्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे व्हिडीओ टाकण्याचे कारस्थान रचण्यात आले असून आपण केवळ मोबाईल पहात होतो. त्यात पोर्न असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, असे या आमदारांचे म्हणणे आहे. संबंधित आमदाराला पक्षाकडून नोटीस देण्यात येईल आणि स्पष्टीकरण मागण्यात येईल, असे प्रतिपादन त्रिपुरा राज्य भाजपचे अध्यक्ष राजीव भट्टाचार्य यांनी केले. स्पष्टीकरणानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. जादबलाल नाथ हे राज्यातील बागबासा मतदारसंघाचे आमदार असून त्यांनी सीपीएमच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 2018 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये समाविष्ट झाले होते. 2018 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र नुकतीच पार पडलेली 2023 ची विधानसभा निवडणूक त्यांनी जिंकली आहे. योग्य ते स्पष्टीकरण देऊ असे त्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकत 2012 मध्ये असाच प्रकार भाजप मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या संदर्भात झाला होता. या घटनेचे व्हिडीओ चित्रण विधानसभा सत्राचे वृत्तांकन करणाऱया पत्रकारांनी केले होते. त्यावेळीही कर्नाटकात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. ही घटना अस्वीकारार्ह असल्याची टीका त्यावेळी अनेकांनी केलेली होती.