याहून हास्यास्पद काहीही नाही, त्यापेक्षा कर्नाटकात नेले असते, तर चांगले झाले असते’
प्रतिनिधी/ मडगाव
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांचे मंत्रिमंडळ केवळ शाहजहानच्या पद्धतींचे पालन करत असताना सुशासनाच्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी गुजरातच्या दौऱयावर जाणे यापेक्षा हास्यास्पद काहीही नाही, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. सरकारी तिजोरीच्या खर्चातून अशा सहलींमध्ये सहभागी होण्यास मी नकार देतो. माझे नाव या यादीतून काढून टाकावे, अस सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
गुजरातमध्ये अभ्यास दौऱयावर जाण्यासाठी ज्या 9 आमदारांची निवड करण्यात आली आहे त्यातील पहिलेच नाव निविदा न काढता कला अकादमीचे काम हाती घेतलेल्या मंत्र्यांचे आहे. शाहजहान पद्धती राबविणाऱया या मंत्र्याच्या घोटाळ्यांसंदर्भात आम्ही आवाज उठवत आलो आहोत. त्यांच्यासोबत जाऊन सुशासनाचे कोणते अनुभव घेणार, असे सरदेसाई यांनी जारी केलेल्या व्हिडीओत म्हटले आहे.
सध्या राज्यात म्हादई व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचा विषय तापत असताना लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हा सर्व खटाटोप असून आपण त्याचा निषेध करतो, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. 19 पासून गोव्यात कार्निव्हल साजरा होणार आहे. या तीन दिवसांतच आम्हाला गुजरातमध्ये नेण्याचा मुहूर्त मिळाला काय, असा सवालही त्यांनी केला आहे.. गुजरातऐवजी कर्नाटकात म्हादई आणि कोळशासंदर्भात चर्चेसाठी नेले असते, तर चांगले झाले असते, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.
19 ते 21 फेब्रुवारीपर्यंत गोवा विधानसभेच्या सुशासन समितीचा गुजरात राज्याचा अभ्यास दौरा होणार असून विधिमंडळ सचिवालयाने गोव्यातील आमदार आणि नोकरशहांचे एक पथक त्याकरिता पाठवायचे आहे आणि गुजरात सरकारने सुशासनाच्या क्षेत्रात अवलंबलेल्या सर्वोत्तम पद्धती या पथकाने जाणून घ्यायच्या आहेत. सदर पथक 19 रोजी गोव्यातून रवाना होऊन 21 रोजी परतेल. याकरिता संबंधित आमदार व मंत्र्यांनी आपली इच्छा पत्राद्वारे एकनाथ सावंत, जनसंपर्क अधिकारी यांना कळवावी, असे सूचित करण्यात आले होते. त्यावर आमदार सरदेसाई यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पथकात निवडलेल्या नावांमध्ये क्रीडामंत्री गोविंद गावडे, आमदार कृष्णा (दाजी) साळकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़े, आमदार विजय सरदेसाई, आमदार ऍड. कार्लुस फेरेरा, आमदार आंतोनियो वाझ, आमदार जेनिफर मोन्सेरात, आमदार डॉ. देविया राणे, आमदार डिलायला लोबो यांचा उल्लेख आहे.