पुरेशा प्रकाशाअभावी जागे करण्याची प्रक्रिया लांबणीवर : आज जागवण्याचा प्रयत्न करणार : इस्रोची माहिती
वृत्तसंस्था/ बेंगळूर
चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर शुक्रवारी म्हणजेच 22 सप्टेंबर 2023 रोजी जागे झाले नाहीत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागे करण्याचा कार्यक्रम एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ते अजूनही झोपेत असून इस्रो लँडर-रोव्हरला शनिवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी जागवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चंद्रावर उजाडण्याचा काळ सुरू झाला असला तरी अजूनही प्रकाश पूर्णपणे उपलब्ध झालेला नाही. साहजिकच चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरला अद्याप पुरेशी ऊर्जा मिळाली नसल्यामुळे विक्रम आणि प्रज्ञानला जागवण्यासाठी शनिवारी प्रयत्न केले जाणार असल्याचे अहमदाबादच्या इस्रोच्या स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई यांनी सांगितले. चांद्रयान-3 वरून अनेक इनपुट मिळाले असून त्याचा इस्रोचे शास्त्रज्ञ सखोल अभ्यास करत आहेत. गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीचेही विश्लेषण केले जात आहे. या काळात प्रज्ञान रोव्हरने 105 मीटरची हालचाल केल्याचेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
मिशन मून म्हणजेच चांद्रयान-3 बाबत एक मोठे अपडेट समोर आले असून चंद्रावर झोपलेले विक्रम आणि प्रज्ञान आणखी विश्र्रांती घेतील. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला जागृत करण्याचा कार्यक्रम आज म्हणजेच 22 सप्टेंबरला एका दिवसासाठी पुढे ढकलला आहे. यापूर्वी इस्रोने 22 सप्टेंबरच्या संध्याकाळी रोव्हर प्रज्ञान आणि लँडर विक्रमला पुन्हा सक्रिय करण्याची योजना आखली होती, परंतु आता काही कारणांमुळे ती 23 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शनिवारी म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी चांद्रयान-3 चे प्रज्ञान आणि विक्रम जागृत करण्याचा प्रयत्न केला जाईल.
विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ‘शिव शक्ती पॉईंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी यशस्वीरित्या उतरले होते. चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी प्रयोग केल्यानंतर इस्रोने या महिन्याच्या सुऊवातीला रोव्हर आणि लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. प्रज्ञान रोव्हरला 2 सप्टेंबर रोजी तर विक्रम लँडरला 4 सप्टेंबर रोजी स्लीप मोडमध्ये ठेवण्यात आल्यापासून दोघेही चंद्रावर शांतपणे झोपले आहेत. चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रिय होऊन पेलोडद्वारे पुन्हा एकदा प्रयोग करण्यास सुरुवात करतील.
सक्रिय करण्याचा प्रयत्न
इस्रो आता लँडर आणि रोव्हर यांच्याशी पुन्हा संपर्क प्रस्थापित करून त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. 20 सप्टेंबरपासून चंद्रावर सूर्योदय होण्यास प्रारंभ झाला असून आता पॅनेल आणि इतर उपकरणे पूर्णपणे चार्ज होत आहेत. सर्व यंत्रणा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतरच लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्याचा प्रयत्न इस्रोकडून केला जाणार आहे. आम्ही लँडर आणि रोव्हर दोन्ही सक्रिय करण्यासाठी आणि आणखी काही उपयुक्त डेटा मिळविण्यासाठी उत्सुक आहोत, असे इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या प्रज्ञान रोव्हरकडून मिळालेल्या डेटाचे विश्लेषण सुरू आहे. तसेच चंद्राच्या मातीचे परीक्षण, भूपृष्ठरचना, पाण्याची स्थिती आणि मानवी जीवनाची शक्मयता याविषयी वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास सुरू आहे.