कोलकाता / वृत्तसंस्था
रामनवमी मिरवणुकांवर दगडफेक आणि धार्मिक दंगलींमुळे अशांत बनलेल्या पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमधील परिस्थिती आता निवळली आहे. मात्र, अद्यापही या दोन राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये जमावबंदी आदेश कायम ठेवण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराची चौकशी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य गुप्तचर यंत्रणेकडे (सीआयडी) सोपविली असून लवकरात लवकर अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारचेही स्थितीवर लक्ष आहे.
बिहारमध्ये नालंदा येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी रुटमार्च केला. राज्यात 40 हून अधिक लोकांना हिंसाचार केल्याच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जाळपोळ केल्याच्या प्रकरणीही काही जणांवर कारवाई करण्यात येत असून आता हावडा आणि उत्तर दिनाजपूर येथे आता शांतता असल्याचे सांगण्यात येते. भाजपने मात्र, राज्य सरकारवरच हिंसाचाऱयांना पाठीशी घातल्याचा आरोप केला असून दंगलींची चौकशी एनआयएकडे द्यावी अशी मागणी केली.