ट्रूडो यांचे आरोप केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित : भारताचा घणाघात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खलिस्तानवादी निज्जर याच्या हत्येसंबंधी कोणताही पुरावा कॅनडाने दिलेला नसल्याने त्या देशाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा आरोप केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे स्पष्ट होते, असे चोख प्रत्युत्तर भारताने दिले आहे. हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी केली, असा आरोप तीन दिवसांपूर्वी ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या संबंधांमध्ये मोठाच तणाव निर्माण झाला आहे. कॅनडाला आणखी एक दणका देताना भारताने गुरुवारी कॅनडातील नागरिकांसाठीची व्हिसा सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी सूचना भारताने कॅनडातील आपल्या दूतावासाला पाठविली आहे. अन्य देशांमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या कॅनडावासियांसाठीही भारताने पुढील आदेशापर्यंत व्हिसा बंद करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
कॅनडा दहशतवाद्यांसाठी नंदनवन
कॅनडाच्या सरकारने दहशतवाद्यांना नंदनवन उपलब्ध करुन दिले आहे. भारताने अनेकदा इशारा देऊनही तेथील भारतविरोधी दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई ट्रूडो यांनी केलेली नाही. तशी त्यांची इच्छाही दिसत नाही. कॅनडातील दहशतवाद्यांना पाकिस्तान प्रोत्साहन आणि पैसा देत आहे. कॅनडाला याची माहिती असूनही त्या देशाचे प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. कॅनडा भारताविरोधात पक्षपाती भूमिका घेत असून हे धोकादायक आहे, असे ठोस प्रतिपादन या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केले.
सहकारी देशांना दिली माहिती
भारताने कॅनडाचे आरोप आणि तेथील परिस्थिती यासंदर्भात सर्व माहिती आपल्या निकटवर्तीय सहकारी देशांना दिली आहे. भारताचा पक्ष या सर्व प्रकरणात भक्कम असून कॅनडाचे आरोप राजकीय हेतूने केलेले आहेत, हे या आरोपांवरुनच स्पष्ट होते. आम्ही कॅनडाकडे तेथील खलिस्तानवादी दहशतवाद्यांची माहिती मागितली होती. तथापि, ती देण्यास ट्रूडो यांनी नकार दिला आहे. यावरुन त्यांची भारतासंबंधीची भूमिका स्पष्ट होते. भारत आपले सार्वभौमत्व आणि सुरक्षा यांच्या संबंधात कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन बागची यांनी केले.
नाव कॅनडाकडून उघड
कॅनडाने देश सोडावयास सांगितलेल्या भारतीय अधिकाऱ्याचे नावही उघड केले आहे. त्यांचे नाव पवन राय असे असून ते कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात असे त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पष्ट केले. ते आता भारतात परतले असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
ट्रूडो यांना घरचा आहेर
ट्रूडो यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढत असतानाच त्यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदाराकडून घरचा आहेर मिळाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कथित नावाखाली ट्रूडो यांचे सरकार दहशतवादाचे उदात्तीकरण करीत आहे. दहशतवाद्यांना सोयी-सुविधा पुरविल्या जात आहेत, असा पर्दाफाश खासदार चंद्रा आर्य यांनी गुरुवारी केला. ट्रूडो सरकारच्या धोरणांमुळे कॅनडातील हिंदू आणि शीख यांच्यात फूट पडण्याची स्थिती आहे. तसेच येथील हिंदू समाजाला भयभीत करण्याचे प्रयत्न हेतुपुरस्सर केले जात आहेत, असे आर्य यांनी स्पष्ट केले आहे.
कॅनडाकडून चूकच
कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी कोणतीही विशिष्ट माहिती न देता भारतावर बेछुट आरोप केला आहे. हा बेजबाबदारपणा आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त झाले आहेत. तसेच खलिस्तानी दहशतवाद्यांना मोकळे रान मिळणार आहे. एका देशाच्या पंतप्रधानाने असे वक्तव्य करणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे ट्रूडो यांनी आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये देशांतर्गत राजकारणाची सरमिसळ करणे योग्य नाही. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे अनेक तज्ञांनीही स्पष्ट केले.
भारताकडून कठोर कारवाई
- भारतावर बेजबाबदार आरोप करणाऱ्या कॅनडावर कारवाई
- कॅनडाच्या नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यावर त्वरित बंदी
- परराष्ट्र विभागाच्या पत्रकार परिषदेत कॅनडावर मोठा प्रहार