अठरा प्रकारच्या व्यवसायिकांना मिळणार लाभ : पंधरा हजारांचे टुल की, कर्ज, प्रशिक्षडणाचा समावेश
पणजी : येत्या 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती दिनी स्वयंपूर्ण गोवा मोहिमेस चार वर्षे पूर्ण होणार असून त्याच दिवशी राज्यात पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या योजनेचा लाभ राज्यातील विविध प्रकारच्या अठरा व्यवसायिकांना होणार असून त्यांना रु. 15,000 ची साहित्य सामग्री (टुल कीट) मोफत देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या वर्षी एक लाख व दुसऱ्या वर्षी दोन लाखांचे कर्जही दिले जाणार आहे. तसेच त्यांना मोफत प्रशिक्षणही मिळणार आहे. रविवार 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत दोन तास स्वच्छता अभियान सर्व सरकारी खाती, पंचायती, नगरपालिका येथे राबवण्यात येणार असून सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी स्वयंपूर्ण ग्रामीण मित्र पंचायतीत स्वयंपूर्ण मोहिमेचा आढावा घेणार आहेत.
ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन
मंत्रिमंडळ बैठकीनंतर डॉ. सावंत यांनी वरील माहिती देऊन पुढे सांगितले की विविध क्षेत्रातील कलाकार, कारागीर दुर्लक्षित राहिले असून त्या सर्वांना विश्वकर्मा योजनेतून चांगले व्यासपीठ देण्यात आले आहे. त्यांची पंचायतीमार्फत नोंदणी करण्यात येणार आहे. पंचायती त्यांची खातरजमा करून देणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधान जनविकास योजना
पंतप्रधान जनविकास योजना 2 ऑक्टोबरपासून गोव्यात राबवण्यात येणार असून त्याचा फायदा अल्पसंख्याकवर्गाला होणार आहे. बार्देश, तिसवाडी, सालसेत, मुरगाव या तालुक्यांतील अल्पसंख्यकांना त्याचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
ई-बाजार संकल्पना पुढे नेणार
चतुर्थी ई-बाजारास चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याच धर्तीवर आता स्वयंपूर्ण ई-बाजार सुरू करण्यात येणार आहे. चतुर्थी ई-बाजारातून 800 ऑर्डर्स (मागण्या) आल्याचे सांगून ती संकल्पना यापुढे ई-बाजारच्या माध्यमातून पुढे नेण्याचे ठरविले आहे. त्यातून सर्व प्रकारच्या स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
ऑनलाईन सेवांना चांगला प्रतिसाद
गोवा ऑनलाईन सेवा पोर्टलवर आतापर्यंत सुमारे 22 लाख विनंत्या आल्याचा दावा त्यांनी केला. त्याचा लाभ जनतेला मोठ्या प्रमाणात होत असून स्वयंपूर्ण ग्रामीण मित्र, पंच, तलाठी, सचिव अशा सर्वांमुळे ऑनलाईन सेवा देणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
दोन अधिकाऱ्यांना सेवा मुदतवाढ
वीज खात्यातील अभियंता अरुण पाटील व वाहतूक पोलीस एसपी बोस्युएट सिल्वा यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
केटरिंगसाठी ‘थॉमस कुक’ची निवड
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेली खाण्यापिण्याची व्यवस्था (केटरिंग) योग्य त्या निविदा प्रक्रियेने पुढे नेली असून ‘थॉमस कुक’ची निवड केल्याचे डॉ. सावंत म्हणाले. मध्यान्ह आहारात अळी सापडल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले ओत. तसेच आयआयटीसाठी जमीन ठरवण्याचे काम सुरू असून अंतिम निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले.
स्वच्छता मोहिमेत विरोधकांनीही सहभागी व्हावे
रविवारी होणाऱ्या 1 ऑक्टोबरच्या स्वच्छता मोहिमेत सर्व सरकारी खाती, त्यांचे कर्मचारी, अधिकारी, मंत्री, आमदार सहभागी होणार आहेत. विरोधी आमदारांनी त्यात भाग घेऊन सहकार्य करावे. त्यांच्यासह जनतेनेदेखील दोन तासांच्या स्वच्छता मोहिमेत भाग घ्यावा. पंचायत खात्याकडून त्याचे आयोजन करण्यात आले असून राज्यात सर्व ठिकाणी ही मोहीम चालणार असल्याची माहिती त्यांनी दिली.