वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी त्यांच्या 15 सदस्यीय संघात दुखापतग्रस्त फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला स्थान दिले असून ‘आयसीसी’ने हा बदल जाहीर केला आहे. अक्षर त्याला झालेल्या दुखापतीतून लवकर सावरण्याची शक्यता नाही. त्यामुळे अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समितीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत दोन सामन्यांमध्ये चार बळी घेतलेल्या 37 वर्षीय अश्विनचे नाव देणे भाग पडले आहे.
भारताच्या आशिया चषकातील सुपर फोर स्तरावरील बांगलादेशविरुद्धच्या लढतीदरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरण्यात अक्षर पटेल अयशस्वी ठरला आहे. त्या दुखापतीमुळे फिरकी गोलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतही खेळू शकला नव्हता, असे आयसीसीने म्हटले आहे.
राजकोटमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी अक्षर वेळेवर सावरू शकला नव्हता. तेव्हाच त्याला बदलले जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली होती. अश्विन भारतीय संघासह गुवाहाटी येथे गेला असून तेथे ते आज शनिवार 30 रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळतील. भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.