Vivekananda Naik solved the water issue in Dodamarg Hospital
दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील बोर वेल बंद पडल्याने रुग्णालयात गेल्या दहा दिवसांमध्ये पाण्याचा तुडवड निर्माण झाला होता. नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मार्फत ही माहिती कळताच येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी तात्काळ स्वखर्चातून रुग्णालयात बोर वेलचा पंप आज उपलब्ध करून दिला.
येथील ग्रामीण रुग्णालयात असलेली बोरवेल गेल्या दहा दिवसांपासून बंद पडली आहे. रुग्णालय प्रशासनाने या संदर्भात दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार संपर्क साधला होता. मात्र बांधकाम विभागाने पूर्णतः दुर्लक्षच केले. पण त्यामुळे रुग्णालयात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली. गेले दहा दिवस रुग्णालयात पाण्याचा विलक्षण तुडवडा जाणवला. या कालावधीत उद्योजक शैलेश गोवेकर यांनी रुग्णालयाला आपल्या टँकर द्वारे पाण्याची मोफत सोय उपलब्ध करून दिली.
ही गोष्ट नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या मार्फत विवेकानंद नाईक यांना समजली. त्यांनी रुगणालय प्रशासनाशी संपर्क साधून सविस्तर माहिती घेतली व स्वखर्चातून तात्काळ बोअरवेल पंप उपलब्ध करून दिला. यावेळी एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय हे संपूर्ण शहरासहित तालुक्यातील प्रत्येक गावाच्या आरोग्याचा आधारवड असून शासनाच्या मदतीची वाट न बघता सर्वांनीच पुढाकार घेऊन एखाद्या गंभीर प्रसंगी आपला सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे असे श्री. विवेकानंद नाईक म्हणाले. .