युवा म. ए. समितीच्या मागणीला यश
बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने मराठीतून मतदारयाद्या द्याव्यात, अशी मागणी युवा म. ए. समितीने केली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मराठीतून मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे युवा समितीच्या मागणीला यश आले असून, भाषिक अल्पसंख्याक आयोगाने यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
बेळगाव, चिकोडी, निपाणी, खानापूर या परिसरात मराठी भाषिक मतदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे मराठीतून मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याची मागणी युवा म. ए. समितीने केली होती. केवळ कन्नडमधून मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्याने मराठी भाषिकांना अनेक अडचणी येत होत्या. भाषिक अल्पसंख्याक आयोगाकडे युवा समितीने तक्रार केल्यानंतर आयोगाने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सदर पत्र वर्ग केले. 1960 च्या मतदार नियमानुसार निवडणूक आयुक्तांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना मराठीतून याद्या देण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिण, ग्रामीण, खानापूर, निपाणी, चिकोडी-सदलगा या मतदारसंघांसाठीच्या मतदारयाद्या मराठीतून देण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षांना मराठीतून मतदारयाद्या आता उपलब्ध होणार आहेत.