ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांनी सकाळी सकाळीच मतदार केंद्रांवर रांगाच रांगा लावल्या आहेत. कसब्यात दुहेरी तर चिंचवडमध्ये तिरंगी लढत होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, आज मतदार राजा कोणाच्या पारड्यात किती मतं टाकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कसब्यामध्ये भाजपने हेमंत रासने यांना, तर महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. चिंचवडमध्ये भाजपने अश्विनी जगताप यांना तर, महाविकास आघाडीने नाना काटे यांना निवडणुकीत उतरविले आहे.तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे हे ही चिंचवडमधून निवडणुकीच्या मैदानात आहेत.
कसबा मतदारसंघात 270 मतदान केंद्रांवर 2 लाख 75 हजार 428 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर चिंचवड मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार असून, 510 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. या निवडणुकांमध्ये किती टक्के मतदान होईल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.