सान फ्रान्सिस्को / वृत्तसंस्था
अमेरिकेचा प्रवासी व्हिसा पहिल्यांदा मिळविणाऱयासाठी आता प्रतीक्षा कालावधी 2 वर्षांहून अधिक काळ लांबला आहे. दिल्ली आणि मुंबईत हा कालावधी आता अनुक्रमे 758 दिवस आणि 752 दिवस इतका झाला आहे. ही माहिती अमेरिकेच्या विदेश विभागाच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
अमेरिकेत प्रथमच प्रवासाला जायचे असेल आणि त्यासाठी आज व्हिसासाठी मुंबईत अर्ज केला असेल तर तो मिळण्यासाठी ऑक्टोबर 2024 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. दिल्लीत अर्ज केला असेल तर यापेक्षा एक महिना कमी वेळ लागणार आहे. कोरोनाची भीती आता नाहीशी झाल्याने अमेरिकेला पर्यटनासाठी जाणाऱयांची संख्या वाढत आहे. मुंबई आणि दिल्लीच्या अमेरिकेच्या व्हिसा कार्यालयांमध्ये यासाठी लांबच लांब रांगा दिसून येऊ लागल्या आहेत. मात्र, व्हिसा देण्याचे प्रमाण ठरलेले असल्याने सर्व इच्छुकांना व्हिसा त्वरित दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे यांना वाट पहावी लागणार आहे. याला काहीच पर्याय नाही, अशी माहिती अमेरिकन दूतावासाच्या मुंबई अधिकाऱयांनी दिली आहे.
मात्र, अमेरिकेला एकापेक्षा अधिक वेळा गेलेल्यांना व्हिसासाठी वाट पहावी लागणार नाही. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी पहिल्या व्हिसाच्या वेळी झालेलीच असल्याने त्यांच्या व्हिसा अर्जावरील प्रक्रिया त्वरित होऊन त्यांना तो मिळू शकतो. अडचण प्रथमच जाऊ इच्छिणाऱयांसाठी आहे, असे स्पष्ट करण्यात आले.