उठा, जागे व्हा ही हाक स्वामी विवेकानंदांनी दिली होती. जागृतीचे त्यांचे हे आवाहन तुम्हा-आम्हा सर्वांसाठी होते. विवेकानंद यांची 12 जानेवारीला जयंती, अनेक ठिकाणी यानिमित्ताने कार्यक्रम होतात. शाळा, महाविद्यालयात प्रतिमा पूजन होते. युवादिन म्हणूनही या जयंतीची विशेष प्रेरणा असते. स्वामीजींचे अवघे जीवन आणि नरेंद्र ते विवेकानंद हा प्रवास, योद्धा संन्याशी म्हणून त्यांची झालेली ख्याती आणि शिकागो धर्मपरिषदेत त्यांनी बंधू-भगिनींनो अशी साद घालत हिंदू धर्माची तत्त्वज्ञानाची आणि विश्वबंधुत्वाची उंचावलेली ध्वजा याचा प्रभाव चिरंतन टिकून आहे. काळ बदलतो आहे. साधन-सुविधा प्रगत होत आहेत. ज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती आणि वेग अनावर वाटावा अशी वेळ आली आहे. अशावेळी उठा, जागे व्हा ही स्वामीजींची हाक सर्वांना अंर्तमुख करणारी आहे. विज्ञान-तंत्रज्ञान यातील प्रगती आणि माणसा-माणसात, देशा-देशात सुरु असलेली पाशवी स्पर्धा यामुळे स्वास्थ्य हरवताना दिसते आहे. चंगळवाद आणि पैसा या भोवतीच मानवी जीवन भोवळ यावी असे गरगर फिरते आहे. जीवनाची उच्च ध्येये, मानवी जीवनाचे उच्चतम ध्येय आणि सारासार विचार हरवताना दिसतो आहे. ‘फिरते रुपया भोवती दुनिया’ हे कवीचे निरीक्षण पण हे फिरणे सहज आनंदी उरलेले नाही अशी अवस्था आहे. पैशाचे आकडे, त्यावरची शून्ये आणि मोठय़ा पॅकेजसाठी महानगरात स्वास्थ्य हरवून ढोर मेहनत करणारी माणसे पाहिली की समाज, समाजशास्त्र आणि विश्वाला दिशा देणारे दार्शनिक जागे नाहीत असे वाटते आणि स्वामीजींचे उद्गार पुन्हा सर्वांच्या कानी-कपाळी आवाज देतात. उठा जागे व्हा. सर्व क्षेत्रात पैशाची प्रगती होत असली तरी मूल्यांची घसरण हेते आहे. गुणपत्रिकेत शत-प्रतिशत गुण असले तरी जीवनाचे धडे आणि जगण्याचे प्रश्न सुटताना दिसत नाहीत, अशी केविलवाणी अवस्था आहे. युद्धे, अण्वस्त्रs, घुसखोरी, दहशतवाद, आतंकवाद, बॉम्बस्फोट, भ्रष्टाचार, अनाचार, स्वैराचार यांनी जगभर उच्छाद मांडला आहे. राजकीय मंडळी तर सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दृष्टचक्रात पारंगत झाली आहेत. खोकी, कंटेनर, बुलडोझर असे भ्रष्टाचाराचे नवे मोजमाप तळागाळापर्यंत रुढ झाले आहे. आपला भ्रष्टाचारी, दुसऱयाचा भ्रष्टाचारी, धाडी, चौकश्या मतपेटय़ा त्यासाठीचा जातीयवाद, आरक्षणे यामुळे सामाजिक ऐक्याला, स्वास्थ्याला गालबोट लागत आहे. गरिबांना, मागासांना जरुर मदत केली पाहिजे. सवलती दिल्या पाहिजेत. पण त्यामागे मतपेटीचा विचार असता कामा नये. लाभार्थी योग्य हवा. शिक्षण, संरक्षण, शेती यावर विशेष लक्ष पुरवले पाहिजे. आज शाळा-महाविद्यालयाची अवस्था तेथे मिळणारे शिक्षण आणि काही शिक्षकांना मिळणारा बडा पगार तर काही शिक्षकांना मिळणारी तुटपुंजी थट्टा यासह शाळा, महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी घेत असलेले खाजगी क्लासचे कोचिंग या सर्वांचा नव्याने आढावा घेतला पाहिजे. दोन लाख महिना पगार घेणाऱया प्राध्यापकांच्या वर्गात दोन विद्यार्थी बसणार नसतील आणि वर्गातील सर्व विद्यार्थी खासगी क्लासला गर्दी करणार असतील तर सर्वांनीच जागे होण्याची गरज आहे. शिक्षण हे नोकरीसाठी नाही पण विद्यार्थ्यांच्या कला, गुण, ज्ञान यांना पैलू पाडून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आहे. आदर्श नागरिक घडविण्यासाठी आहे. पण शाळा-महाविद्यालय शिक्षणसंस्था त्यांची दुकाने झाली आहेत. संस्था चालक जमेल तेथून धार काढत आपले धंदे व राजकारण साधताना दिसत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू यातून कितपत साध्य होतो हे तपासायला हवे. कोरोनाची साथ ही जगभरची मोठी आपत्ती होती आहे. पण या आपत्तीने अनेक क्षेत्रातील भ्रम दूर झाले आहेत. कोरोनापूर्वीचे जग आणि कोरोनानंतरचे जग अशी विभागणी आता प्रस्थापित झाली आहे. कोरोना काळात मोठय़ा पॅकेजचा आणि महानगरातील राहणीमानाचा फुगा फुटला आहे. दोन वर्षे शाळा बंद होत्या. हॉटेल्स बंद होती. पर्यटन थांबले होते. जग ठप्प झाले होते. त्याकाळात माणूस, माणुसकी, जीवनमूल्ये, गरजा, जात, धर्म, राजकारण, समाजसेवक यांचे खरे दर्शन जगाला झाले. अनेक माणसे डोळय़ांनी बघतात. त्यांना दृष्टी असते. पण दृष्टीकोन असतोच असे नाही. ऑपरेशन केल्याने दृष्टी सुधारते. दृष्टीकोन नाही. त्यामुळेच स्वामी विवेकानंद म्हणतात, जागे व्हा याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीने या निशा भूतानाम तस्यम जागृती संयमी असे म्हटले आहे. सर्व झोपी जातात तेव्हा संयमी माणुस जागा असतो आणि अशा जागृत माणसांची गरज असते भारत हा विश्वगुरु व्हावा. जग म्हाताऱया माणसांनी भरत चालले असताना भारत तरुण युवा होतो आहे. ज्ञान, तंत्रज्ञान आणि तत्वज्ञान यात आघाडी घेतो आहे. ही आनंदाची पर्वणी आहे. पण या पर्वणीतही जागे राहावे, संयमी राहावे, व सर्वांना जागे करणे महत्त्वाचे आहे. जाणीवाचा हा जागर संतांनी, विरांनी, महापुरुषांनी सतत घातला आहे. या विचारावर भारत वर्ष उभे आहे. तथापि भ्रष्टाचाराची, चंगळवादाची, जातीयवादाची आणि मतलबी स्वार्थाची लागण झाल्याने महाराष्ट्र प्रांती महापुरुषाची बदनामी सुरु आहे. संत, महात्मे, विचारवंत यांची अवहेलना, बदनामी होते आहे आणि राजकारण, मतपेटी, पैसा, जात, भ्रष्टाचार याला फाजील महत्त्व आले आहे. यातून बाहेर पडायचे असेल तर मोठे स्वप्न, मोठे विचार आणि व्यापक भूमिका घेऊन काम करावे लागेल. संकुचित दृष्टीकोन आणि संकुचित माणसे यांना बाजूला करुन चांगले विचार, आचार आणि सार्वहित याची कास धरावी लागेल. तोच खरा प्रगतीचा, उन्नतीचा, कल्याणाचा मार्ग आहे. तो अवलंबला तर भारत विश्वगुरु होईलच पण माणसा-माणसात द्वेष आणि चुकीची स्पर्धा संपून नवी जागृती येईल. उठा, जागे व्हा या चिरंतन आवाहनाचा तोच अर्थ आहे. या जागृतीतच विश्वकल्याण आहे. स्वामी विवेकानंद नव्याने समजून घेतले पाहिजे. आचरणात आणले पाहिजेत आणि सर्वांनी जागे होऊन खऱया आनंदाचा, प्रगतीचा, उन्नतीचा मार्ग अवलंबिला पाहिजे. युवा पिढीने ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान यात नवीन शोध, त्या शोधांचा अर्थ आणि जीवनाला आलेली गती अभ्यासली पाहिजे. या नव्या गतीची, वेगाची सवय करुन घेतली पाहिजे आणि भारताला विश्वगुरुपदी आरुढ करण्यासाठी अथक काम केले पाहिजे.
Previous Articleटाटा स्टील देणार युनिटची जबाबदारी संपूर्णपणे महिलांकडे
Next Article इस्रायल पंतप्रधानांना भारतभेटीचे निमंत्रण
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment