वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर निवृत्त होण्याची शक्यता आहे. याबाबतची घोषणा तो सिडनीतील शेवटच्या कसोटीनंतर करण्याची अपेक्षा आहे. सिडनी हे त्याचे घरचे मैदान आहे.
शनिवारी बेकेनहॅम येथे वॉर्नरने निवृत्तीबाबत संकेत दिले. डब्ल्यूटीसी अंतिम लढतीसाठी तो तयारी करीत होता. ‘डब्ल्यूटीसी फायनल व नंतर होणाऱ्या अॅशेस मालिकेनंतर पाकविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाल्यास मी त्यावेळी निश्चितच निवृत्ती जाहीर करेन,’ असे त्याने सांगितले. टी-20 क्रिकेट प्रकारातील निवृत्तीबाबतही त्याने भाष्य केले. ‘या प्रकारात धावा करण्याची गरज आहे. 2024 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा माझी शेवटची स्पर्धा असेल, असे मी याआधीच म्हटले आहे. माझ्या येथे आणि ऑस्ट्रेलियात धावा झाल्या तर विंडीजविरुद्ध मी खेळणार नाही, हे निश्चित. आयपीएल व अन्य फ्रँचायजी लीगमध्ये मात्र मी आणखी काही काळ खेळत राहीन,’ असे त्याने सांगितले.