तहसीलदार कार्यालयात नमुना क्र. 10 मिळण्यासाठी रितसर अर्ज करूनही उत्तर नाही
खानापूर : खैरवाड येथील शेतकरी यल्लाप्पा कृष्णा बरगुकर, आनंदी गावडू गावडा उर्फ पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून तहसीलदार कार्यालयात नमुना क्रमांक 10 मिळावा यासाठी रितसर अर्ज केला आहे. त्यांना अद्याप याबाबत कोणतेच लेखी उत्तर देण्यात आले नसल्याने या दोन्ही कुटुंबीयांनी आता तहसीलदार कार्यालयासमोर सोमवार दि. 25 एप्रिलपासून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
खैरवाड येथील सर्व्हे नंबर 113 या जमिनीचे रयत या नात्याने त्यांनी भू लवाद मंडळाकडे अर्ज करून सर्व्हें नं. 113 मधील यल्लाप्पा बरगुकर यांना 2 एकर 26 गुंठे, आनंदी गावडू यांना 2 एकर 26 गुंठे अशी जमीन मंजूर करण्यात आली. मात्र नमुना क्रमांक 10 मिळाल्यानंतर मालक म्हणून घोषित करण्यात येते. तो मिळावा म्हणून 10-11-2020 रोजी रितसर तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला. मात्र याबाबत तहसीलदार कार्यालयात संबंधित खात्याच्या अधिकाऱयांना भेटून विचारल्यावर वेळ मारुन नेण्यात येत होती. अद्याप याबाबत दोन्ही कुटुंबीयांना तहसीलदार कार्यालयाकडून कोणतेच लेखी उत्तर देण्यात आले नाही.
याबाबत या दोन्ही कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, लोकायुक्त अशा विविध खात्यांकडे अर्ज केले होते. त्याबाबत तहसीलदार कार्यालयाला पत्र येऊन देखील त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने या कुटुंबीयांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सोमवार दि. 25 पर्यंत जर नमुना क्रमांक 10 आम्हाला न मिळाल्यास आम्ही सर्व कुटुंबीय तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती लक्ष्मी बरगुकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.