स्वागत कमानी, पुष्पवृष्टी, गोड पदार्थांचे वितरण : ग्रामीण भागात बैलगाडीतून मिरवणूक
बेळगाव ; दीड ते पावणेदोन महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी पुन्हा एकदा शाळा परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजला. सरकारी व खासगी शाळांनी अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. सरकारी शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांचा हा दिवस आनंदात गेला. सोमवार दि. 29 मे पासून 2023-24 या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. पहिले दोन दिवस शाळांची स्वच्छता व इतर कामकाजाचे नियोजन यामध्ये गेले. शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेप्रमाणे बुधवारी सर्वच शाळांमध्ये प्रारंभोत्सव आयोजित करण्यात आला होता. शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना फुले देणे, गोड पदार्थांचे वाटप करणे अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
जिल्हा पंचायतीचे सीईओ हर्षल भोयर यांनी बुधवारी भेंडीगेरी येथील सरकारी प्राथमिक शाळेतील प्रारंभोत्सव कार्यक्रमाला भेट दिली. विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यासह अधिकारी व भेंडीगेरी ग्राम पंचायतीचे सदस्य उपस्थित होते. काही शाळांमध्ये प्रवेशद्वारांवर आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट करण्यात आली होती. शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना वर्गापर्यंत नेण्यात आले. ग्रामीण भागात काही शाळांमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. काही शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मुकुट तयार केले होते. याचबरोबर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पाठ्यापुस्तके, गणवेश यांचे वितरण करण्यात आले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 1,709 प्राथमिक शाळा तर 551 उच्च प्राथमिक शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. दुसरी ते दहावी या वर्गांमध्ये एकूण 3 लाख 96 हजार 740 विद्यार्थी दाखल झाले होते. बुधवारी सकाळपासूनच शाळा परिसरामध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. बऱ्याच शाळांनी दुपारपर्यंत सत्र चालवून त्यानंतर सुटी दिली.